GST Price Whats Get Cheaper : वस्तू व सेवा करातील (जीएसटी २.०) नवी द्विस्तरीय दररचना आजपासून (सोमवार, २२ सप्टेंबर) लागू होत आहे. ‘जीएसटी’चे ०, ५, १२, १८ व २४ टक्के असे पाच दरटप्पे होते. त्यामध्ये नुकतेच सुलभीकरण करण्यात आले असून ५ व १८ हे दोनच दरटप्पे कायम ठेवण्यात आले आहेत. या जीएसटी दरकपातीमुळे स्वयंपाकघरातील साहित्य, इलेक्ट्रॉनिक्स, औषधे, चारचाकी व दुचाकी वाहनांसह अनेक वस्तू व सेवा आजपासून स्वस्त होणार आहेत. केंद्र सरकारने एकूण ३७५ वस्तूंवरील जीएसटीचे दर कमी केले आहेत. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून ही दरकपात लागू होत आहे. यामुळे लोकांना नवरात्रोत्सव आणि येणारा दिवाळीचा सण जल्लोषात साजरा करता येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “जीएसटीचे दर कमी झाल्यामुळे लोकांना वैयक्तिक स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. मग, ते घर बांधणे असो, टीव्ही किंवा फ्रीज खरेदी करणे असो अथवा स्कूटर, बाइक, कार खरेदी करणे असो. या वस्तू आता स्वस्तात मिळतील. सर्वसामान्यांचा प्रवासही परवडणारा असेल. कारण बहुसंख्य हॉटेल खोल्यांवरील जीएसटीचे दर कमी झालेले आहेत.”
नवीन जीएसटी दरांनुसार टीव्हीच्या किमती कमी होणार
जीएसटी दरकपातीमुळे टीव्हीच्या किमतींमध्ये ८५ हजार रुपयांपर्यंत घट होईल. ३२ इंचांपेक्षा मोठी स्क्रीन असलेल्या टीव्हीवर पूर्वी २८ टक्के जीएसटी आकारला जात होता. आता या टीव्हीवर १८ टक्के जीएसटी आकारला जाईल. त्यामुळे या टीव्हीच्या किमतीत २,५०० रुपये ते ८५,००० रुपयांपर्यंतची घट होईल. मिंट या वृत्तसंकेतस्थळाने याबाबतची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
टीव्हीच्या किमतींमध्ये झालेली घट (ब्रॅण्डनुसार)
- सोनी इंडिया – ५,००० रुपये ते ७१,००० रुपये
- एलजी – २,५०० रुपये ते ८५,८०० रुपये.
- पॅनासॉनिक – ३,००० रुपये ते ३२,००० रुपये.
एसीच्या किमतीही आजपासून कमी होतील. कारण एसीवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे.
एसीच्या किमतींमध्ये झालेली घट (ब्रॅण्डनुसार)
- गोदरेज अप्लायन्स : ८,५५० रुपये ते १२,५०० रुपये.
- हायर : ३,९०५ रुपये ते ४६,०८५ रुपये.
- एलजी : १ टन थ्री स्टार एसीची किमत २,८०० रुपयाने कमी होणार आहे.
रेफ्रिजरेटर व डिशवॉशर किती स्वस्त होणार?
- गोदरेज : रेफ्रिजरेटरच्या किमतीत ७% ते ८% कपात.
- एलजी : रेफ्रिजरेटरच्या किमतीत ८% ते ९% पर्यंत कपात.
- डिशवॉशरच्या किमतीत ८,००० रुपयांपर्यंत कपात होईल.