केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच त्यांच्या हटके भूमिकांसाठी चर्चेत असतात. वाहतूक क्षेत्रातील त्यांच्या योजना, अनेक मोठमोठे प्रकल्प, इलेक्ट्रिक वाहनांसाठीचा आग्रह अशा अनेक मुद्द्यांमुळे नितीन गडकरी कायम चर्चेत राहतात. आता पुन्हा एकदा त्यांच्या एका विधानाची चर्चा होताना दिसत आहे. यावेळी नितीन गडकरींनी नोकरदार वर्गाबाबत केलेलं विधान चर्चेत आलं आहे. दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी देशातील वाहतूक व्यवस्थेसंदर्भात सविस्तर भूमिका मांडली.
एनएचएआय अर्थात नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियासंदर्भात या भाषणात नितीन गडकरींनी भूमिका मांडली. बीओटी तत्वावर तयार करण्यात येणाऱ्या प्रकल्पांवरही त्यांनी मुद्दे मांडले. या प्रकल्पांमध्ये सहभागी होणाऱ्या कंत्राटदारांबाबत बोलताना नितीन गडकरींनी पगारासंदर्भातलं विधान केलं. “एनएचआयच्या यशाची कथा आख्ख्या जगात पोहोचली आहे. याचं श्रेय कधीकधी मला मिळतं. पण मी त्याचा एकटा दावेदार नाही. याचं श्रेय अधिकारी, कर्मचारी आणि तुमच्यासारख्या लोकांचं आहे. हे टीम वर्क आहे”, असं गडकरी म्हणाले.
नितीन गडकरींचा विरोधकांना टोला!
दरम्यान, बीओटी तत्वावर उभ्या राहणाऱ्या रस्ते प्रकल्पाबाबत गडकरींनी यावेळी उल्लेख केला. “मी देशातल्या पहिल्या बीओटी प्रकल्पावर काम सुरू केलं तेव्हा जगदीश टायटलर मंत्री होते. मी दिल्लीला येणं-जाणं करत होतो. महाराष्ट्रात मंत्री होतो. पण या प्रकल्पासाठी त्यांना राजी करण्यात फार अडचणी होत्या. हा प्रकल्प आला तेव्हा संसदेत विरोधी पक्षांनी टीका केली की ‘रस्ते बीओटीवर करत आहात तर सरकारही बीओटीवर चालवायला का देत नाहीत?’ आता हे म्हणणारे लोक माझ्याकडे येतात आणि म्हणतात जर माझा रस्ता तयार होत नसेल तर बीओटीमध्ये करून द्या”, असा टोला नितीन गडकरींनी यावेळी लगावला.
“२०१४ च्या आधीच्या ३-४ वर्षांत काही अडचणी आल्या. बीओटीला यशस्वी करायचं असेल तर आपल्याला आधीच्या अनुभवातून झालेल्या चुका समजून घ्याव्या लागतील. आम्ही तेव्हा बीओटी प्रकल्पासाठी २० टक्के जमीन अधिग्रहण झाल्यावर आम्ही प्रकल्प सुरू करून टाकला. सामग्री हलवण्याची समस्या होती. प्रत्येक नवा चीफ इंजिनिअर नवीन काहीतरी सांगायचा. खासगी कंत्राटदारांनी बँकेकडून कर्ज घेतलं होतं. आर्थिकदृष्ट्या त्यांच्यासाठी अशा प्रकल्पांमध्ये अवघड परिस्थिती होती”, असं गडकरी म्हणाले.
बँकेचं कर्ज आणि पैशाचं मूल्य
दरम्यान, पगारदार व्यक्तीला पैशांचं मूल्य कधीच कळणार नाही, असं गडकरी यावेळी म्हणाले. “मी कधीकधी म्हणतो की ज्यांना एक तारखेला पगार मिळतो, त्यांना पैशाचं मूल्य कधीच कळत नाही. काही लोक बँकेकडून कर्ज घेऊन प्रकल्प करतात. एकेक दिवसागणिक त्यांचा व्याजदर वाढून त्यांची परिस्थिती बिघडत असते. त्यामुळे अडथळे दूर करणं आणि उपाय शोधणं हे एक आव्हानच होतं. मी मंत्री झालो तेव्हा माझ्याबरोबर अर्थमंत्री अरुण जेटली होते. प्रत्येक वेळी आम्ही याच मुद्द्यांवर अडकून पडत होतो”, असं गडकरी म्हणाले.
भारतीयांमध्ये नैसर्गिक कौशल्य
दरम्यान, लोकसंख्यावाढ आणि वाहनांच्या उत्पादनाची वाढ ही नैसर्गिक कौशल्य भारतीयांमध्ये असल्याचं गडकरी म्हणाले. “बीओटीचा सगळ्या महत्त्वाचा संबंध वाहतुकीच्या तणावाशी आहे. आणि भारतात एक नैसर्गिक कौशल्य आहे. ते म्हणजे लोकसंख्या कशी वाढवायची आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात उत्पादन कसं वाढवायचं. या दोन्ही क्षेत्रांत लोक फार वेगाने काम करतायत. त्यामुळे त्याची चिंता करण्याची गरज नाही. आपल्या देशात एकूण वाहनं १९ कोटी आहेत. फास्ट ट्रॅक ७ कोटी आहेत”, अशी मिश्किल टिप्पणी गडकरींनी यावेळी केली.