बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारकडे बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. नितीश कुमार म्हणाले, बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी आम्ही मोहीम हाती घेणार आहोत. राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन जनतेशी याबाबत बोलणार आहोत. केंद्र सरकारला बिहारची प्रगती हवी असेल तर त्यांनी बिहार राज्याला विशेष दर्जा द्यावा. असं केल्यास दोन वर्षांत बिहारची प्रगती होईल. केंद्र सरकारने बिहारला विशेष राज्याचा दर्जा दिला नाही तर याचा अर्थ असा होतोय की केंद्र सरकारलाच बिहारची प्रगती नको आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिहारची राजधानी पाटना येथील बापू सभागृहात नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री उद्यमी योजना २०२३-२४ च्या लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण केले. यावेळी नितीश कुमार बोलत होते. या कार्यक्रमावेळी केलेल्या भाषणादरम्यान, नितीश कुमार यांनी केंद्र सरकारकडे बिहार राज्याला विशेष दर्जा देण्याची मागणी केली. तसेच ते म्हणाले, केंद्राने आमची मागणी मान्य केली नाही तर आम्ही केंद्र सरकारविरोधात तीव्र आंदोलन उभं करू.

नितीश कुमार म्हणाले, बिहारला विशेष राज्याचा दर्जा यापूर्वीच मिळायला हवा होता. तसं झालं असतं तर आतापर्यंत राज्याचा खूप विकास झाला असता. राज्यात सध्या केंद्र सरकार पुरस्कृत योजनांचं प्रमाण ६०:४० असं आहे. याचा राज्याला काहीच फायदा होत नाही. आपल्या राज्याला विशेष दर्जा मिळाल्यास आपण हे पैसे वाचवू आणि त्यातून राज्यात इतर कामं होतील. यावर्षी मी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात राज्यातल्या गावागावांमध्ये जाऊन योजनांची परिस्थिती पाहिली होती. आता मी पुन्हा एकदा राज्यभर फिरणार आहे.

हे ही वाचा >> सर्वोच्च न्यायालयाने सुनावल्यानंतर तमिळनाडूचे राज्यपाल नरमले, प्रलंबित विधेयकांवर घेतला निर्णय

केंद्र सरकार बिहारला कमी निधी देत असल्याचा आरोप यावेळी नितीश कुमार यांनी केला. बिहारचे मुख्यमंत्री म्हणाले, “अनेक राज्यांना केंद्र सरकारच्या योजनांचा योग्य पद्धतीने लाभ दिला जात नाही. मी लवकरच राज्यव्यापी दौऱ्यावर जाईन आणि जनतेला याबाबत माहिती देईन.” आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने नितीश कुमार यांचा हा राज्यव्यापी दौरा महत्त्वाचा असणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitish kumar says will start movement if bihar not given special status asc