Mallikarjun Kharge on CJI B R Gavai Attack: भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर भर न्यायालयात वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून अनेक राजकीय नेत्यांनी याची दखल घेत गवई यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही या प्रकरणावर भाष्य केले आहे. तसेच उत्तर प्रदेशमधील बरेली येथे एका दलित व्यक्तीची जमावाने हत्या (लिंचिंग) केल्याबद्दलही त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
जर सरन्यायाधीशांवर बूट फेकला जात असेल तर सामान्य लोक, कारकून आणि अधिकाऱ्यांचे भवितव्य काय असेल? असा सवाल मल्लिकार्जुन खरगे यांनी उपस्थित केला. मागच्या आठवड्यात पेसमेकर बसविण्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे.
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वृद्ध वकील राकेश किशोर यांनी बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना खरगे म्हणाले, त्यांची विचारसरणी अशी आहे की, ते माणसाला माणूस म्हणून मानत नाहीत. आधुनिक समाजात महिलांना दर्जा देत नाहीत. हजारो वर्षांपासून मानवाला गुलमागिरीत ठेवणाऱ्या धर्माबद्दल ते बोलतात.
भारताला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्ष झाल्यानंतरही काही लोकांमध्ये अशा प्रकारची मानसिकता असल्याबाबत मल्लिकार्जुन खरगे यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले, मनुस्मृती आणि सनातन धर्माच्या नावाखाली जे कुणी इतरांच्या मुलभूत हक्कांवर हल्ला करत असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. जे लोक विनाकारण समाजात तणाव निर्माण करण्याचा आणि कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना शिक्षा झाली पाहिजे.
पुरोगामी विचारसरणीच्या लोकांनी अशा प्रकरणात पुढे येऊन एकत्र राहिले पाहिजे, असेही आवाहन खरगे यांनी केले.
हल्ल्यानंतर सरन्यायाधीश भूषण गवई काय म्हणाले?
भारताचे ५२ वे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांच्यावर भर न्यायालयात बूट फेकण्याचा प्रयत्न झाला. यानंतरही गवई कोणताही गोंधळ न करता शांत होते. त्यांनी वकिलाला आपली बाजू मांडण्यास सांगितले. तसेच न्यायालयात उपस्थितांना उद्देशून ते म्हणाले, “विचलित होऊ नका, मीही विचलित झालेलो नाही.”