Om Birla Gets Angry in Parliament Monsoon Session : लोकसभेचं पावसाळी अधिवेशन चालू आहे. गेल्या दोन दिवसांपासून सभागृहात अर्थसंकल्प २०२४ वर चर्चा चालू आहे. या चर्चासत्रात देशभरातील खासदार प्रश्न विचारत आहेत आणि मंत्री त्या प्रश्नांना उत्तरं देत आहेत. आज (२६ जुलै) काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी लोकसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस सादर केली. तसेच भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमांची स्थिती, चीनबरोबरच्या व्यापारात झालेलं नुकसान यावर चर्चा करण्याची मागणी केली. दरम्यान, तिवारी बोलत असतानाच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला काही खसदार आणि एका मंत्र्यावर संतापल्याचं चित्र पाहायला मिळालं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सभागृहाचं कामकाज चालू असताना एक मंत्री खिशात हात टाकून सभागृहात आले आणि ते त्यांच्या टेबलाजवळ जात होते. ते पाहून लोकसभा अध्यक्ष संतापले. ओम बिर्ला त्यांची नाराजी व्यक्त करत म्हणाले, “मंत्री जी तुमचे हात खिशातून बाहेर काढा… मी संसदेच्या सर्व सदस्यांना आग्रह करतो की तुम्ही सर्वजण खिशात हात टाकून सभागृहात येऊ नका. ठीक आहे ना?”

ओम बिर्ला यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर मंत्री काहीतरी उत्तर देण्याचा प्रयत्न करत होते. ते पाहून ओम बिर्लांचा पारा आणखी चढला. लोकसभा अध्यक्ष मंत्री महोदयांना म्हणाले, तुम्ही मध्ये का बोलताय. तुम्हाला काय विचारायचं आहे ते सांगा, तुम्ही इतरांना खिशात हात टाकून सभागृहात फिरण्याची परवानगी द्याल का? मला हे वागणं योग्य वाटत नाही. सर्व सदस्यांना माझं आणखी एक सांगणं आहे की संसदेचे एखादे सदस्य बोलत असताना दुसऱ्या कोणत्याही सदस्याने बोलणाऱ्या सदस्यासमोर बसू नये. इतर सदस्यांनी त्याच्या मागे जाऊन बसावं.

लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला

हे ही वाचा >> “नाव जाहीर करण्याचा कुणावर दबाव टाकता येणार नाही”, सुप्रीम कोर्टानं यूपी सरकारला सुनावलं!

महाराष्ट्राच्या खासदारालाही सुनावलं (Om Birla Namdev Kirsan)

गडचिरोलीचे काँग्रेस खासदार नामदेव किरसान यांना काल (२५ जुलै) संसदेत बोलण्याची संधी मिळाली. यावेळी त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील काही अडचणी मांडल्या. तसेच महाराष्ट्रातील रेल्वेच्या पायाभूत सुविधांबाबतचे काही मुद्दे मांडले. मात्र किरसान यांच्या एका हातात कागद होता, तर त्यांचा दुसरा हात खिशात होता. ते पाहून लोकसभा अध्यक्षांनी किरसान यांचं भाषण मध्येच थांबवलं आणि म्हणाले, “पुढच्या वेळी खिशात हात टाकून भाषण करू नका. सर्व सदस्यांना मी आग्रह करतो की त्यांनी सभागृहात भाषण करत असताना अथवा प्रश्नोत्तराच्या तासावेळी बोलत असताना खिशात हात टाकून बोलू नये. इतर सदस्यांनीही ही गोष्ट लक्षात ठेवावी. कारण अनेकजण असं करतात.” ओम बिर्ला यांनी काल सर्व सदस्यांना तंबी दिलेली असतानाही आज एक मंत्री खिशात हात टाकून सभागृहात आले, हे पाहून ओम बिर्ला संतापल्याचं पाहायला मिळालं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Om birla angry in parliament on minister dont come hands in your pockets asc