१९८४ मध्ये झालेलं ऑपरेशन ब्लू स्टार याबाबत सगळ्या देशालाच कल्पना आहे. इंदिरा गांधी आपल्या देशाच्या पंतप्रधान असताना त्यांनी ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला होता. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी हे ऑपरेशन राबवलं गेलं. मात्र सैन्य सुवर्ण मंदिरात बुटांसह शिरलं आणि तिथे रक्ताचे सडे पडले त्यामुळे शिख धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या. ज्यामुळे इंदिरा गांधींची हत्या झाली. माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी ऑपरेशन ब्लू स्टारची पद्धत चुकीची होती असं म्हटलं आहे.
पी चिदंबरम यांचं वक्तव्य काय?
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्लू स्टारचा जो निर्णय़ घेतला त्याची पद्धत चुकीची होती. त्याची किंमत इंदिरा गांधींना त्यांचा जीव गमावून चुकवावी लागली. पत्रकार हरिंदर बावेजा यांनी ‘दे विल शूट यू मॅडम’ हे पुस्तक लिहिलं आहे. त्यावर हिमाचल प्रदेशातील कसौली या ठिकाणी साहित्य महोत्सवात चर्चा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पी. चिदंबरम यांनी विधान केलं.
मला कुणाचाही अनादर करायचा नाही-चिदंबरम
चिदंबरम पुढे म्हणाले, “मला एकाही लष्करी अधिकाऱ्याचा अनादर करायचा नाही. मात्र ऑपरेशन ब्लू स्टार ज्या प्रकारे राबवण्यात आलं ते चुकीचं होतं. या ऑपरेशननंतर काही वर्षांनी लष्कराने सुवर्ण मंदिर बायपास करुन आणि ते सुरक्षित ठेवत मुक्त करण्यासाठीचा योग्य पर्याय निवडला होता. पण मला आजही हे मान्य आहे की ऑपरेशन ब्लू स्टार चुकीच्या पद्धतीने राबवलं गेलं. ज्याची किंमत इंदिरा गांधींना त्यांचा जीव गमावून चुकवावी लागली.”
इंदिरा गांधींनाच दोष देता येणार नाही
दरम्यान पी. चिदंबरम असंही म्हणाले की ऑपरेशन ब्लू स्टार हे लष्कर, पोलीस, गुप्तचर विभाग या सगळ्यांनी मिळून घेतलेला निर्णय होता. त्यामुळे या निर्णयासाठी फक्त इंदिरा गांधींना दोष देता येणार नाही. दरम्यान मी पंजाबला अनेकदा येऊन गेलो आहे. मला हे वाटतं की फुटिरतावादी आणि खलिस्तानी लोकांची घोषणा आता विरुन गेली आहे. या ठिकाणी मुख्य समस्या आर्थिक स्थिती आहे.
काय होतं ऑपरेशन ब्लू स्टार?
पंजाबच्या अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात करण्यात आलेल्या ऑपरेशन ब्लू स्टारला ४० वर्षे झाली आहेत. खलिस्तान या वेगळ्या राष्ट्राची मागणी करणारे शीख अतिरेकी सुवर्ण मंदिरामध्ये तळ ठोकून बसले होते. या शीख अतिरेक्यांविरोधातील ऑपरेशन ब्लू स्टारची कारवाई जून १९८४ मध्ये सुरू करण्यात आली होती. या ऑपरेशनदरम्यान शेकडो सामान्य नागरिकांचा तसेच ८७ भारतीय जवानांचाही मृत्यू झाला होता. सुवर्ण मंदिर हे शिखांचे पवित्र धर्मस्थळ मानले जाते. या कारवाईमुळे या सुवर्ण मंदिराचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मात्र, हे ऑपरेशन का करावे लागले आणि पुढे त्याचे भारतीय राजकारणावर गंभीर परिणाम झाले.