Pakistan Adds Salman Khan To Terrorist List: बॉलिवूड अभिनेता सलमान खान गेल्या आठवड्यात रियाध फोरममध्ये सहभागी झाला होता. सलमान खानने तेथे केलेल्या आपल्या भाषणात पाकिस्तान आणि बलुचिस्तानचा वेगवेगळा उल्लेख केला होता. यामुळे तो आता एका मोठ्या राजनैतिक वादात सापडला आहे.

सलमान खानच्या या भाषणानंतर पाकिस्तान सरकारने त्याचे नाव त्यांच्या चौथ्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केले आहे. चौथी अनुसूची पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी कायदा (१९९७) अंतर्गत एक श्रेणी आहे. ही यादी दहशतवादी संघटना किंवा दहशतवादी कारवायांशी संबंध असल्याचा संशय असलेल्या व्यक्तींसाठी राखीव असते. या यादीत ज्यांचे नाव समाविष्ट केले जाते त्यांना देखरेखीखाली ठेवले जाते. याबाबत विविध वृत्तांचा हवाला देत इंडिया टुडेने वृत्त दिले आहे.

अद्याप अधिकृत दुजोरा नाही

दरम्यान, १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सोशल मीडिया युजर नासिर अझीमने शेअर केलेली एक कथित अधिसूचना व्हायरल होत आहे. या अधिसूचनेत दावा केला जात आहे की, सलमान खानला “आझाद बलुचिस्तान फॅसिलिटेटर” या कारणासाठी दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट केले आहे. असे असले तरी या अधिसूचनेला अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. शिवाय, कोणत्याही विश्वासार्ह पाकिस्तानी माध्यमांनी याबाबत वृत्त दिलेले नाही किंवा याला दुजोरा दिलेला नाही.

काय म्हणाला होता सलमान खान?

जॉय रियाध फोरमध्ये बोलताना सलमान खान म्हणाला होता की, “तुम्ही जर एखादा हिंदी चित्रपट बनवला आणि तुम्ही तो इथे प्रदर्शित केला (सौदी अरब) तर तो चित्रपट सुपरहिट ठरेल. तुम्ही तमिळ, तेलुगू किंवा मल्याळी चित्रपट बनवला आणि प्रदर्शित केला तर तो चित्रपटही कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करेल. कारण सौदी अरबमध्ये दुसऱ्या देशांतून आलेल्यांची संख्या मोठी आहे. अनेकजण बलुचिस्तानमधून आले आहेत, अफगाणिस्तानातून आले आहेत आणि पाकिस्तानातूनही आले आहेत.”

बलुच नेत्यांकडून सलमान खानचे कौतुक

सलमान खानच्या या वक्तव्याचे बलुच फुटीरतावादी नेत्यांकडून कौतुक करण्यात आले होते. स्वतंत्र बलुचिस्तानचे प्रमुख समर्थक मीर यार बलोच म्हणाले होते की, “सलमानच्या या वक्तव्यामुळे सहा कोटी बलुच लोकांना आनंद झाला आहे. बलुचिस्तानलाचा वेगळे करून सलमान खानने अशी गोष्ट केली आहे जी अनेक राष्ट्रे करण्यास कचरतात.”