Pakistan On Donald Trump : अमेरिका आणि भारतामधील टॅरिफच्या मुद्द्यावरून संबंध ताणले गेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही महिन्यांपासून सातत्याने भारतावर टीका करत आहेत. मात्र, दुसरीकडे अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये जवळीक वाढत असल्याचं चित्र दिसून येत आहे. याचं कारण म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी मागील काही महिन्यांत डोनाल्ड ट्रम्प यांची अनेकदा भेट घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे अमेरिका-पाकिस्तानमध्ये नेमकं काय शिजतंय? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता.
यातच आता एक मोठी माहिती समोर आली आहे. पाकिस्तानने एक मोठी चाल खेळली असून थेट अमेरिकेला अरबी समुद्रात बंदर बांधण्याची आणि चालवण्याची ऑफर दिली असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात पाकिस्तानने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे ही विनंती केली आहे. या संदर्भातील वृत्त फायनान्शियल टाईम्सच्या हवाल्याने इंडिया टुडेनी दिलं आहे.
वृत्तानुसार, पाकिस्तान अमेरिकेशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. यातच आता पाकिस्तानने अरबी समुद्रात बंदर बांधण्याची आणि चालवण्याची ऑफर डोनाल्ड ट्रम्प यांना दिली आहे. हे बंदर पाकिस्तानमधील बलुचिस्तानच्या ग्वादर जिल्ह्यातील पास्नी या ठिकाणी असेल. हे बंदर भारत इराणमध्ये विकसित करत असलेल्या चाबहार बंदराजवळ असेल. सामरिकदृष्ट्या चाबहार बंदर हे इराण आणि भारत या दोन्ही देशांसाठी महत्त्वाचं आहे. मात्र, आता पाकिस्तानने अमेरिकेला थेट बलुचिस्तानच्या ग्वादरमध्ये बंदर बांधण्याची विनंती केल्यामुळे याचा भारतावर काही परिणाम होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
समोर आलेल्या अहवालात म्हटलं आहे की पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या सल्लागारांनी १.२ अब्ज डॉलर्सपर्यंतच्या या ऑफरसह अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. तसेच अमेरिका पास्नीमधील पाकिस्तानच्या महत्त्वाच्या खनिजांपर्यंत पोहोचण्यासाठी बंदरावर एक टर्मिनल बांधेल आणि चालवेल. अशांत बलुचिस्तान प्रांतातील हे शहर अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमेवर आहे.
दरम्यान, पाकिस्तानी लष्करप्रमुख आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सप्टेंबरमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बंद दाराआड बैठक केल्यानंतर काही दिवसांतच ही माहिती समोर आली आहे. त्या बैठकीत शाहबाज शरीफ यांनी खाणकाम आणि ऊर्जा क्षेत्रात अमेरिकन कंपन्यांकडून गुंतवणूक मागितली होती असं सांगितलं जात होतं.
भारत विकसित करत असलेलं चाबहार बंदर कुठं आहे?
गल्फ ऑफ ओमनच्या किनाऱ्यावर असलेले चाबहार बंदर हे इराणचे पहिले खोल पाण्याचे बंदर आहे. जागतिक सागरी व्यापाराच्या दृष्टीने हे बंदर अतिशय महत्त्वाचे आहे. हे बंदर इराण-पाकिस्तान सीमेवर पश्चिमेस आणि पाकिस्तानमध्ये चीन विकसित करत असलेल्या ग्वादर बंदराच्या पूर्वेस आहे. सामरिकदृष्ट्या चाबहार बंदर हे इराण आणि भारत या दोन्ही देशांसाठी महत्त्वाचे आहे. या बंदरामुळे भारताला पाकिस्तानच्या हद्दीत न शिरता थेट अफगाणिस्तान आणि मध्य आशियाशी व्यापार करता येऊ शकतो. याशिवाय हे बंदर प्रस्तावित इंटरनॅशनल नॉर्थ-साउथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर (INSTC)चादेखील एक भाग आहे. हा कॉरिडोर हिंद महासागराला पर्शियन गल्फ, इराण कॅस्पियन समुद्रमार्गे पुढे रशियातील सेंट पीटर्सबर्ग आणि उत्तर युरोपला जोडतो.