Operation Sindoor Pakistani Missile : श्रीनगरच्या दल सरोवरात क्षेपणास्राचे अवशेष सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. चार महिन्यांपूर्वी झालेल्या भारत-पाकिस्तान संघर्षावेळी पाकिस्तानी लष्कराने भारतावर डागलेल्या क्षेपणास्त्राचे हे अवशेष असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. भारताची ऑपरेशन सिंदूर ही मोहीम चालू असताना पाकिस्तानी लष्कराने प्रत्युत्तरात डागलेलं क्षेपणास्त्र या सरोवरात कोसळलं असावं असा अंदाज वर्तवला जात आहे.

२२ एप्रिल २०२५ रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता, ज्यामध्ये २६ पर्यटक मृत्यूमुखी पडले. त्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरोधात मोहीम उघडली होती. ऑपरेशन सिंदूर या मोहीमेद्वारे भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले केले. याचवेळी भारत व पाकिस्तानच्या वायूदलांमध्ये संघर्ष झाला. त्याचदरम्यान, पाकिस्तानी लष्कराने भारतावर डागलेलं क्षेपणास्त्र दल सरोवरात कोसळलं असावं असा संशय व्यक्त केला जात आहे.

सरोवराच्या स्वच्छतेदरम्यान सापडले क्षेपणास्त्राचे अवशेष

एका अधिकाऱ्याने दी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की हे अवशेष दल सरोवराच्या स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडले आहेत. हे एक क्षेपणास्त्र असू शकतं. याची बनावट कुठली आहे ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, ते पाकिस्तानी लष्कराने ऑपरेशन सिंदूरवेळी डागलेलं असावं असं प्रथमदर्शनी दिसत आहे. कारण ऑपरेशन सिंदूर मोहीम चालू असताना सरोवराच्या पाण्यात कुठलीतरी वस्तू पडल्याचं आमच्या कानावर आलं होतं. स्थानिक प्रशासनाने रविवारी दल लेकची स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. या साफसफाईदरम्यान सरोवरात क्षेपणास्त्राचे अवशेष सापडले. पुढील तपासणीसाठी हे अवशेष वायूदलाकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.

दरम्यान, सूत्रांनी सांगितलं की श्रीनगरमधील एखादं लष्करी तळ हे पाकिस्तानी लष्कराचं लक्ष्य असावं, परंतु, त्यांचं क्षेपणास्र सरोवरात पडलं. श्रीनगरमधील बदामी बाग यथे लष्कराच्या १५ कॉर्प्सचं मुख्यालय आहे. जे दल सरोवरापासून केवळ एक किलोमीटर अंतरावर आहे. सरोवरात सापडलेलं क्षेपणास्त्र हे १० मे रोजी रात्री डागल्याची प्राथमिकी माहिती समोर आली आहे.

एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितलं की क्षेपणास्त्राचे अवशेष वायू दलाला सुपूर्द करण्यात आले आहेत. हे पाकिस्तानच्या फतेह मिसाइलचे अवशेष असावेत असा संशयही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मात्र, त्यांनी स्पष्ट केलं की याची नेमकी बनावट फॉरेन्सिक तपासणीनंतरच कळेल.