देशाची फाळणी आणि बाबरी मशिदीच्या पतनानंतर भारतीय समाजाचे कधी नव्हे इतके ध्रुवीकरण गेल्या वर्षभरात झाल्याचे सांगत माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. ते शुक्रवारी दिल्लीत त्यांच्या ‘अ इयर इन अपोझिशन’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. भारतीय समाजाचे ध्रुवीकरण झाले आहे हे आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे. तुमच्या मुस्लिम आणि दलित मित्रांशी एकदा बोला. जमिनीचे लहान तुकडे असणाऱ्या शेतकऱ्यांशी बोला. या लोकांशी संवाद साधल्यानंतर तुम्हाला कळेल की, देशातील गरीब आणि अल्पसंख्याक जनतेमध्ये किती असुरक्षितता आणि भीतीचे वातावरण आहे. आपण सध्या प्रचंड फूट पडलेल्या आणि ध्रुवीकरण झालेल्या सामाजिक परिस्थितीकडे वाटचाल करत असल्याचे चिदंबरम यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी जेएनयू प्रकरणासंदर्भात स्मृती इराणी यांनी संसदेत दिलेल्या स्पष्टीकरणावरही भाष्य केले. विद्यापीठ म्हणजे तुम्हाला काय वाटते. विद्यापीठ म्हणजे काही बालवाडी नव्हे. विद्यापीठ ही अशी जागा आहे की जिथे विद्यार्थी म्हणून मला चुकीचे वागण्याचा हक्क आहे. विद्यापीठात केवळ विद्वत्तापूर्ण वर्णन झालेच पाहिजे, असे काही नाही. मी त्याठिकाणी हास्यास्पदही वागू शकतो, असे चिदंबरम यांनी म्हटले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Partition babri now our most polarised years chidambaram