निर्यात आणि देशांतर्गत व्यापार वाढविण्यासाठी सरकार लवकरच उपाययोजना करणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी दिली. अन्य देशांकडूून एकतर्फी कारवाईपासून उद्योगांचे संरक्षण करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचेदेखील ते म्हणाले. अमेरिकेने २७ ऑगस्टपासून भारतीय वस्तूंवर ५० टक्के शुल्क लादले असतानाच गोयल यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. दरम्यान, निर्यातदारांनी दिलेल्या माहितीनुसार, या अतिरिक्त शुल्काचा परिणाम कोळंबी मासे, रसायने, चामडे आणि पादत्राणे यासारख्या कामगार केंद्रित क्षेत्रातील वस्तूंवर होणार आहे.

शुल्क लादल्यानंतर व्यापार स्तरावर निर्माण झालेल्या सध्याच्या जागतिक अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी गोयल यांनी निर्यातदारांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. निर्यातीत विविधता आणण्यासाठी सरकार परदेशातील भारतीय दूतावासांसह सर्व भागधारकांशी सल्लामसलत करत असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.

जागतिक बाजारपेठेत भारताचा निर्यातीचा वाटा कमी आहे, त्यामुळे व्यापार आघाडीवर जागतिक अनिश्चिततेबाबत आपल्याला जास्त काळजी करण्याची गरज नसल्याचे गोयल म्हणाले.

दरम्यान, पुढील आठवड्यात होत असलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत मागणी जलद गतीने वाढविण्यासाठी आणि देशांतर्गत उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, असे गोयल यांनी सांगितले.