Piyush Goyal On Donald Trump Tariff : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील धोरणाची जगात मोठी चर्चा सुरू आहे. ट्रम्प यांनी अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात आयातशुल्क लावल्यामुळे अनेक देशांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. यातच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर देखील १ ऑगस्टपासून तब्बल २५ टक्के टॅरिफ आणि त्यावर अतिरिक्त निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या टॅरिफचा भारतावर काय परिमाण होणार? तसेच ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर भारत काय भूमिका घेणार? केंद्र सरकार नेमकी कोणते पावलं उचलणार? भारत या संदर्भात काही निर्णय घेणार का? याविषयीची सरकारची भूमिका केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी आज संसदेत बोलताना स्पष्ट केली आहे. अमेरिकेने लादलेल्या २५ टक्के टॅरिफबाबत केंद्र सरकार परिणाम तपासत असून आम्ही राष्ट्रीय हिताचे रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलणार असल्याचं मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे.
मंत्री पियुष गोयल काय म्हणाले?
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं की, “सरकार अलीकडील घटनांचा परिणाम तपासत आहे. आम्ही आमच्या राष्ट्रीय हिताचे रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलू. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय निर्यातदार, उद्योग आणि सर्व भागधारकांशी चर्चा करत आहे. या मुद्द्यावरील त्यांच्या मूल्यांकनाची माहिती गोळा करत आहे. शेतकरी, कामगार, उद्योजक, उद्योगपती, निर्यातदार, एमएसएमई आणि औद्योगिक क्षेत्रातील भागधारकांच्या कल्याणाचे रक्षण करण्यास सरकार सर्वोच्च प्राधान्य देते. आम्ही आमच्या राष्ट्रीय हिताचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व पावले उचलणार आहोत”, असं ते म्हणाले. या संदर्भातील वृत्त एएनआयने एक्सवर दिलं आहे.
#WATCH | US Tariffs | Union Minister of Commerce and Industry Piyush Goyal says, "Government is examining the impact of the recent events…We will take all necessary steps to safeguard our national interest."
— ANI (@ANI) July 31, 2025
"Government is examining the impact of the recent events. Ministry of… pic.twitter.com/C6rHFIRRI5
अमेरिकेकडून भारतावर २५ टक्के टॅरिफ
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यानी बुधवारी (३० जुलै) मोठी घोषणा केली. त्यांनी म्हटलं आहे की येत्या १ ऑगस्ट २०२५ पासून भारताला २५ टक्के टॅरिफ (आयात शुल्क) भरावं लागेल. ट्रुथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी एक पोस्ट करून यासंबधीची माहिती दिली. ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की भारत व अमेरिका मित्र राष्ट्रे असूनही गेल्या काही वर्षांमध्ये उभय देशांमध्ये फारसे व्यावसायिक व्यवहार झालेले नाहीत.”
अमेरिकेने २५ टक्के टॅरिफ लादल्यानंतर भारताने काय म्हटलं?
अमेरिकेने २५ टक्के टॅरिफ लादल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिलं. या संदर्भात भारत सरकारने एक प्रेस निवेदन जारी करत म्हटलं की, भारत सरकारने द्विपक्षीय व्यापाराबाबत अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या विधानाची दखल घेतली आहे. अमेरिकेच्या २५ टक्के टॅरिफच्या परिणामाबाबत सरकार अभ्यास करत आहे. सरकारने म्हटले आहे की, “भारत आणि अमेरिका गेल्या काही महिन्यांपासून निष्पक्ष, संतुलित आणि परस्पर फायदेशीर द्विपक्षीय व्यापार करारावर पोहोचण्यासाठी वाटाघाटी करत आहे. आम्ही या उद्दिष्टासाठी वचनबद्ध आहोत.”
“तसेच सरकार आपल्या शेतकरी, उद्योजक आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या कल्याणाचे रक्षण करण्यास सर्वोच्च महत्त्व देतं. युकेसोबतच्या व्यापक आर्थिक आणि व्यापार करारासह इतर व्यापार करारांच्या बाबतीत जे केलं गेलं आहे तसं सरकार आपल्या राष्ट्रीय हितांचं रक्षण करण्यासाठी आवश्यक ते सर्व पावले उचलेल”, असं निवेदनात म्हटलं आहे.