Rahul Gandhi Criticize PM Modi: ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना घाबरतात’, अशी खोचक टीका लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करणार असल्याचा शब्द दिला असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच केला आहे. या दाव्यानंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. ते म्हणाले, टॅरिफ वाढ आणि भारत-पाकिस्तान सशस्त्र संघर्षात मध्यस्थी केल्याचा दावा ट्रम्प यांनी वारंवार केल्यानंतरही पंतप्रधान मोदी सोशल मीडियावर त्यांचे अभिनंदन करत राहिले.

राहुल गांधी यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत मोदींना लक्ष्य केले. राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये पाच घटना सांगितल्या आहेत. या पाच घटनांवरून त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.

तत्पूर्वी डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले होते?

व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबाबत मोठा दावा केला. ते म्हणाले, रशियाकडून तेलाची आयात थांबवावी यासाठी मी पंतप्रधान मोदींना समजविण्याचा प्रयत्न केला. माझ्या मित्राने रशियाकडून तेलाची आयात थांबविण्याचा शब्द दिला आहे. यापुढे ते रशियाचे तेल विकत घेणार नाहीत. हा निर्णय काही आताच होणार नाही. याची एक प्रक्रिया आहे. पण ती लवकरच सुरू होईल.

दरम्यान, केंद्र सरकारकडून ट्रम्प यांच्या दाव्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.

राहुल गांधी यांनी काय आरोप केला?

राहुल गांधी यांनी खालील कारणे दिली आहेत.

१. भारत रशियन तेल खरेदी करणार की नाही, हे ठरविण्याची आणि जाहीर करण्याची ट्रम्प यांना परवानगी देणे.

२. ट्रम्प वारंवार अवहेलना करत असूनही त्यांना अभिनंदनाचे संदेश पाठवणे.

३. अर्थमंत्र्यांचा अमेरिकेचा दौरा रद्द करणे.

४. इजिप्तमधील शर्म-अल-शेखची बैठक टाळणे.

५. ऑपरेशन सिंदूरबाबत ट्रम्प यांनी केलेल्या दाव्याचे खंडन न करणे.

पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांचे अभिनंदन कधी केले?

इस्रायल-हमास यांच्यातील संघर्ष थांबवून गाझा शांतता करार केल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी एक्सवर ट्रम्प यांचे अभिनंदन करणारी पोस्ट शेअर केली होती. तसेच पतंप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांना फोन करून गाझामध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांबाबत अभिनंदन केले होते.

तथापि, ऑपरेशन सिंदूर थांबविण्यात मी मध्यस्थी केली, असा दावा ट्रम्प यांनी केला होता. पंतप्रधान मोदींनी या दाव्याचे अद्याप खंडन केलेले नाही.