Pm Modi Uk Visit : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यात २४ जुलै द्विपक्षीय चर्चा झाली. यावेळी भारत आणि ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. या करारामुळे जवळपास ३४ अब्ज डॉलर्सने व्यापार वाढण्याची अपेक्षा आहे.

या दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्याबरोबर’चाय पे चर्चा’ केली आहे. पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान कीर स्टार्मर यांचा ‘चाय पे चर्चा’ करतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे या माध्यमातून भारत आणि इंग्लंडमधील संबंध अधिक मजबूत असल्याचा संदेश देण्यात आला आहे.

दरम्यान, पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्याबरोबरचा ‘चाय पे चर्चा’ करतानाचे काही फोटो पंतप्रधान मोदींनी एक्सवर (ट्विटर) शेअर केले आहेत. तसेच पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, “पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या बरोबर ‘चाय पे चर्चा.’ ही चाय पे चर्चा भारत आणि इंग्लंडमधील संबंध अधिक मजबूत करत आहे.”

‘चाय पे चर्चा’च्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती ‘मसाला चहा’ असं लिहिलेल्या कागदाच्या कपमध्ये किटलीतून चहा ओतताना दिसत आहे. तसेच यावेळी त्या व्यक्तीने पंतप्रधान कीर स्टार्मर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधताना सामचा चहा आणि केरळचा मसाला असं म्हणताना दिसत आहे.

मोदींचं उत्तर ऐकून ब्रिटनचे पंतप्रधानही आश्चर्यचकित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रिटनच्या दौऱ्यादरम्यान झालेल्या एका पत्रकार परिषदेतील एका हलक्याफुलक्या क्षणाची चांगलीच चर्चा रंगली आहे. पत्रकार परिषदेत अनुवादकाला हिंदीत बोलताना काही अडचणी येत असल्याचं पाहायला मिळालं. मात्र, हे लक्षात येताच पंतप्रधान मोदींनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर हे देखील आश्चर्यचकीत झाल्याचं पाहायला मिळालं.

नेमकं काय घडलं?

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्याबरोबर संयुक्त पत्रकार परिषदेत सुरू होती. यावेळी अनुवादक हिंदीत संवाद साधत असताना काहीशी अडचण येत होती. मात्र, यानंतर पंतप्रधान मोदींनी हस्तक्षेप केला आणि म्हणाले की, “काळजी करू नका, इंग्रजी चालेल.” पंतप्रधान मोदींचं हे उत्तर ऐकून ब्रिटनचे पंतप्रधानही हसले. त्यानंतर कीर स्टार्मर यांनी खास त्यांच्या शैलीत दिलेल्या उत्तराची चर्चा रंगली आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर म्हणाले की, “मला वाटतं की आपण एकमेकांना चांगलं समजतो.” त्यांच्या या उत्तरामुळे भारत आणि ब्रिटनमधील ऐतिहासिक व्यापार करारावरील स्वाक्षरी झाल्यानंतर दोन्ही देशातील सौहार्दपूर्ण मैत्रीची एक अनपेक्षित झलक या माध्यमातून दिसून आली. या संयुक्त पत्रकार परिषदेतील या प्रसंगाची व्हिडीओची क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.