PM Modi speaks to Russian president Vladimir : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के आयात शुल्क लादल्यानंतर भारत आणि अमेरिकेमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, असं असतानाच दुसरीकडे भारत आणि रशियामधील संबंध आणखी दृढ होत असल्याचं दिसून येत आहे. याचं कारण म्हणजे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे लवकरच भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत.

दरम्यान, यातच आता भारताचे पंतप्रधान मोदी यांनी व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवरून संवाद साधत त्यांना ७३ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय म्हटलं?

“माझे मित्र राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी बोललो आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. गेल्या काही वर्षांत भारत-रशिया संबंध अधिक दृढ करण्याच्या त्यांच्या वैयक्तिक वचनबद्धतेचं मनापासून कौतुक करतो,” असं पंतप्रधान मोदी यांनी एक्स (ट्विटर) वरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पुतीन यांच्या भारतभेटीवर शिक्कामोर्तब

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंध ताणलेले आहेत. यादरम्यान भारत आणि रशिया यांच्यातील संबंध आणखी मजबूत झाल्याचं दिसून येत आहे. व्लादिमीर पुतिन यांनी ते लवकरत भारताच्या दौऱ्यावर येणार असल्याची पुष्टी काही दिवसांपूर्वीच केलेली आहे. पुतिन हे या वर्षी डिसेंबरमध्ये भारतात येणार असल्याची बातमी समोर आली होती. यादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना पुतिन यांनी ते या दौऱ्यासाठी आणि त्यांचे ‘प्रिय मित्र’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी उत्सुक आसल्याचंही म्हटलेलं आहे.