नवी दिल्ली : ‘कमळाचे फूल’ हाच भाजपचा उमेदवार असून कार्यकर्त्यांनी पुढील शंभर दिवस मेहनत घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाला ३७० जागा मिळवून द्या, हीच जनसंघाचे संस्थापक व भाजपचा वैचारिक आधार ठरलेले श्यामाप्रसाद मुखर्जी यांना आदरांजली ठरेल, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘भारतमंडपम’मध्ये शनिवारी भाजपच्या दोन दिवसांच्या राष्ट्रीय अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यापूर्वी मोदींच्या उपस्थितीत राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये एप्रिल-मे मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची रणनितीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये मोदींनी, २०२४च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या ३७० जागांच्या लक्ष्याचे महत्त्व स्पष्ट केले.

३७० जागांचे महत्त्व

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी अनुच्छेद ३७० च्या माध्यमातून जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देण्याला विरोध केला. मोदी सरकारने ऑगस्ट २०१९ मध्ये हा विशेषाधिकार रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. मोदी सरकारने मुखर्जी यांच्या विचारांची अंमलबजावणी केली असल्याने भाजपसाठी ३७० हा केवळ आकडा नसल्याचा मुद्दा मोदींनी अधोरेखित केला.

हेही वाचा >>> सिंहिणीच्या सीता नावावरून वाद

आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडून वेगवेगळे भावनिक मुद्दे उपस्थित केला जातील. पण, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने गरिबांच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याचा प्रचार-प्रसार करण्याचे आवाहन मोदींनी पदाधिकाऱ्यांनी केले. दहा वर्षांमध्ये गरिबांसाठी विविध योजना राबवल्या. उचित आर्थिक धोरण लागू करून देशाला पुन्हा विकासाच्या मार्गावर नेले. जागतिक स्तरावर देशाला सन्मान वाढवला. याच तीन मुद्दयांभोवती लोकसभा निवडणुकीचा प्रचार केंद्रीत असेल, असेही मोदींनी स्पष्ट केले.

या निवडणुकीत ‘विकसीत भारत, मोदींची गॅरंटी आणि तिसऱ्यांदा मोदी सरकार’ हा भाजपचा नारा असेल! भाजपप्रणित ‘एनडीए’ला ‘चारसो पार’ जागा मिळवून देण्यासाठी प्रत्येक बूथ कार्यकर्त्यांने मतदान केंद्रांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असेही मोदींनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितले. केंद्र सरकारच्या विविध योजना लाभार्थीपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपच्या वतीने २५ फेब्रुवारीपासून जनसंपर्क मोहीम सुरू केली जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पत्रकारांना दिली.

१६१ मतदासंघांकडे अधिक लक्ष

गेल्या वेळी पराभव झालेल्या देशातील १६१ लोकसभा मतदारसंघांपैकी अधिकाधिक जागा जिंकण्याचे भाजपचे ध्येय आहे. त्यासाठी दीड वर्षांपासून तयारी केली गेली होती. प्रत्येक मतदारसंघामध्ये जबाबदारी देण्यात आलेल्या केंद्रीय मंत्र्याने किमान तीन वेळा भेटी दिलेल्या आहेत. तिथले महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था यांचीही मदत घेण्यात आली आहे, अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली.

मोदींच्या सूचना

* १०० दिवस अथक परिश्रम घ्या, बुथ स्तरावर लक्ष केंद्रीत करा.

* मोदी सरकारच्या योजनांचे महत्त्व मतदारांपर्यंत पोहोचवा

* युवा, महिला, गरीब व शेतकरी या चार स्तंभांच्या विकासासाठी केंद्र सरकारने केलेल्या कामांची माहिती पोहोचवा.

* पहिल्यांदा मतदार करणाऱ्या युवा मतदारांपर्यंत पोहोचा. * २०१४ पूर्वी काँग्रेसच्या १० वर्षांच्या काळातील भ्रष्टाचार, घोटाळे, धोरणलकवा यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi appeal to bjp workers to keep 3 seats target in lok sabha poll zws