पीटीआय, चुराचांदपूर

विविध संघटनांना हिंसाचारापासून दूर राहण्याचे आवाहन करताना, केंद्र सरकार मणिपूरमधील जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे दिले. मणिपूरसारख्या संघर्षग्रस्त राज्याला शांतता आणि समृद्धीचे प्रतीक बनवण्याच्या ध्येयासाठी काम करत असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

मणिपूरमध्ये मे २०२३ मध्ये वांशिक हिंसाचार उफाळल्यानंतर या राज्याच्या पहिल्याच भेटीत कुकी-बहुल चुराचांदपूर जिल्ह्यातील एका जाहीर सभेला पंतप्रधान मोदी यांनी संबोधित केले. प्रदीर्घ वांशिक हिंसाचारग्रस्त मणिपूरला भेट न दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधी पक्षांनी तीव्र टीका केली आहे. हाच धागा पकडत मोदी यांनी केंद्र सरकार या भागाच्या शांततेसाठी करत असल्याच्या प्रयत्नांचा उल्लेख केला.

‘मणिपूर ही आशा आणि आकांक्षांची भूमी आहे. दुर्दैवाने या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडली’, असे मोदी म्हणाले. ‘विकासासाठी शांतता आवश्यक आहे. गेल्या ११ वर्षांत ईशान्येकडील राज्यांतील अनेक संघर्ष आणि वाद सोडवले गेले. यानंतर येथील लोकांनी शांतीचा मार्ग निवडला, तसेच विकासाला प्राधान्य दिले, असे मोदी यांनी स्पष्ट केले. ‘मणिपूरच्या नावात ‘मणि’ आहे. येणाऱ्या काळात हे रत्न संपूर्ण इशान्य भारतासाठी चमकणार आहे. केंद्र सरकार मणिपूरला विकासाच्या मार्गावर पुढे नेण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मी आज तुमच्या सर्वांमध्ये आहे’, असे मोदी यांनी सांगितले.

तुमचा राजधर्म कुठे आहे? : काँग्रेस

‘मोदी यांनी मणिपूरमध्ये स्वत:च्या स्वागतासाठी भव्य सोहळा आयोजित केला. मोदी यांची ही कृती येथील पीडितांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा प्रकार आहे,’ अशी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केली. ‘तुमच्या स्वत:च्या शब्दात… तुमचा राजधर्म कुठे आहे?’ असा प्रश्नही खरगे यांनी ‘एक्स’वरून मोदींना केला. मोदी यांच्या दोन वर्षे उशिराने झालेल्या मणिपूर दौऱ्यावर लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी शनिवारी टीका केली. तसेच मोदींचा हा दौरा येथील नागरिकांऐवजी स्वत:च्या प्रतिमेवर जास्त भर देणारा होता, असा आरोपही गोगोई यांनी केला.

मतपेढीच्या राजकारणाचा ईशान्येला फटका : मोदी

ऐझवाल (मिझोरम): ‘पूर्वीच्या मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्येकडील राज्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. परंतु आता केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या प्रयत्नांमुळे हा भाग देशाच्या विकासाचे इंजिन बनत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले. २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर मिझोराम येथील शनिवारच्या दुसऱ्या भेटीदरम्यान मोदींनी नऊ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले.

हिंसाचारग्रस्त नागरिकांशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मणिपूरमधील वांशिक हिंसाचारामुळे विस्थापित झालेल्या कुकी आणि मैतेई या दोन समुदायातील नागरिकांशी संवाद साधला. मोदी यांनी इंफाळमधील ऐतिहासिक कांगला किल्ला संकुल आणि चुराचांदपूरमधील शांतता मैदानावर विस्थापित व्यक्तींच्या समस्या ऐकल्या. तसेच राज्यात शांतता पुनर्स्थापित करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचे आश्वासन दिले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मी मणिपूरमधील सर्व संघटनांना शांततेच्या मार्गावर पुढे जाण्याचे आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचे आवाहन करतो. सरकार मणिपूरच्या लोकांबरोबर आहे. आम्ही मणिपूरला शांती, समृद्धी आणि प्रगतीचे प्रतीक बनवण्याच्या ध्येयाकडे काम करत आहोत. नरेंद्र मोदीपंतप्रधान

मोदीजी, मणिपूरमध्ये तुमचा तीन तासांचा दौरा हा एक प्रकारचा विनोद, प्रतीकात्मक अपमान आहे. आज इम्फाळ आणि चुराचांदपूरमध्ये तुमचा तथाकथित ‘रोड शो’ म्हणजे मदत छावण्यांमधील नागरिकांच्या ओरडण्यापासून पळून जाण्यापेक्षा दुसरे काहीही नाही. मल्लिकार्जुन खरगेअध्यक्ष, काँग्रेस