नवी दिल्ली : ‘‘भारत आणि आग्नेय आशियायी देशांच्या संघटनेमधील (आसिआन) सर्वसमावेशक सामरिक भागीदारी ही जागतिक स्थिरता आणि विकासाची पायाभरणी म्हणून समोर येत आहे,’’ असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. ‘‘२०२६ हे वर्ष ‘आसिआन-भारत सागरी सहकार्य’ वर्ष म्हणून आम्ही जाहीर करीत आहोत,’’ असे मोदी म्हणाले.
भारत-आसिआन वार्षिक शिखर परिषदेला पंतप्रधान मोदी प्रत्यक्ष उपस्थित नाहीत, त्यांनी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून परिषदेला संबोधित केले. ‘आसियान’ संघटना ही भारताच्या ‘पूर्वेकडील देशांबरोबर संबंध सुधारण्यासाठी कृती’ धोरणाचा महत्त्वाचा घटक असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘भारताने ‘आसिआन’ला कायमच पाठिंबा दिला आहे.
आताच्या अस्थिरतेच्या काळात भारत-आसियान सामरिक भागीदारीमध्ये प्रगती होत आहे. ही मजबूत भागीदारी जागतिक स्थिरता आणि विकासाची पायाभरणी म्हणून उदयास येत आहे. प्रत्येक संकटाच्या काळात ‘आसिआन’ देशांबरोबर भारत खंबीरपणे उभा आहे. तसेच, सागरी सुरक्षेमध्ये परस्परसहकार्य आणि सागरी अर्थव्यवस्था जलदगतीने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर २०२६ हे वर्ष ‘आसियान-भारत सागरी सहकार्य’ वर्ष म्हणून आम्ही जाहीर करीत आहोत.’’
शिक्षण, पर्यटन, विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य, हरित ऊर्जा, सायबर सुरक्षा यामध्येही परस्परसहकार्य वाढत आहे. भारत-आसिआन देशांमधील सांस्कृतिक वारसा आणि जनतेमधील थेट संबंध मजबूत करण्याच्या दृष्टीने आम्ही एकत्र काम करीत राहू. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
काँग्रेसची टीका
नवी दिल्ली : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘आलिंगन राजनैतिकता’ आज क्वालालंपूर येथे दिसली नाही. यात कुठलेही आश्चर्य नाही,’ अशी टीका काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले, ‘‘ट्रम्प यांनी किमान सहा वेळा रशियाकडून भारत तेलखरेदी कमी करीत असल्याचे विधान केले आहे. या वेळी त्यांनी भारत रशियातून तेलखरेदी शून्यावर आणेल, असे विधान केले. क्वालालंपूर येथे मोदींचे ‘आलिंगन’ या वेळी दिसले नाही, यात कुठलेही आश्चर्य नाही.’’ ट्रम्प यांनी रविवारीदेखील पुन्हा एकदा भारत रशियाकडून तेल खरेदी थांबवत असल्याचे विधान केले.
