PM Narendra Modi Declines Trump’s invitation : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून बातचीत केली. यावेळी ट्रम्प यांनी मोदी यांना कॅनडा येथे आयोजित जी-७ शिखर परिषदेतून परतताना काही वेळ अमेरिकेत थांबण्याची विनंती केली. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी त्यास नकार दिला आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी एक व्हिडीओ प्रसारित करून दोन नेत्यांमधील संभाषणाची माहिती दिली आहे. ते म्हणाले, “दोन नेत्यांमध्ये तब्बल ३५ मिनिटे फोनवरून बातचीत झाली. यावेळी दोघांनी अनेक जागतिक व स्थानिक मुद्द्यांवर चर्चा केली”.
विक्रम मिस्री म्हणाले, “डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांना विचारलं की तुम्ही कॅनडावरून परतत असताना अमेरिकेला येऊ शकता का? मात्र, मोदी यांनी त्यांच्या नियोजित कार्यक्रमांचं कारण सांगत अमेरिकेला जाण्यास असमर्थता दर्शवली”. पंतप्रधान मोदी सध्या तीन देशांच्या परराष्ट्र दोऱ्यावर आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा (सोमवार, १६ जून) सायप्रस दौऱ्यावर होते. तिथून ते कॅनडाला गेले. आता कॅनडावरून क्रोएशियाला जाणार आहेत. क्रोएशिया हा मोदींच्या तीन देशांच्या परराष्ट्र दौऱ्याचा अंतिम टप्पा आहे. तिथून ते भारतात परतणार आहेत. मोदी यांनी अमेरिकेला जाण्यास असमर्थता दर्शवल्यामुळे ट्रम्प यांना मोदींशी फोनवरूनच चर्चा करावी लागली. परिणामी दोन्ही नेत्यांमध्ये फोनवर अर्ध्या तासाहून अधिक वेळ चर्चा झाली.

दोन नेत्यांमध्ये काय चर्चा झाली?

भारताचे परराष्ट्र सचिव म्हणाले,“जी-७ शिखर परिषदेच्या वेळी मोदी व ट्रम्प यांची भेट होणार होती. मात्र, ट्रम्प यांना परिषद आटोपल्यावर तातडीने अमेरिकेला परतावं लागलं, परिणामी त्यांची मोदींबरोबर बैठक होऊ शकली नाही. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या विनंतीवरून आज दोन्ही नेत्यांनी फोनवरून चर्चा केली.

अमेरिका भेटीबद्दल पंतप्रधान मोदी काय म्हणाले? पाहा व्हिडीओ

मोदी यांची ट्रम्प यांच्याशी प्रामुख्याने ऑपरेशन सिंदूर आणि दहशतवादाविरोधातील भारताच्या कारवाईवर चर्चा झाली. दरम्यान, मोदी यांनी जी-७ परिषदेवेळी स्पष्ट केलं की ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारत व पाकिस्तानमध्ये जो युद्धविराम झाला त्यामध्ये कुठल्याही तिसऱ्या पक्षाची अथवा देशाची मध्यस्थी नव्हती. भारत व अमेरिकेमधील व्यापाराबाबतच्या कराराचा त्या युद्धविरामाशी काडीमात्र संबंध नाही.

मोदी ट्रम्प यांना म्हणाले, पहलगाम हल्ल्यानंतर भारताने दहशतवादाविरोधात कारवाई करण्याचा आपला निर्धार जगासमोर स्पष्ट केला आहे. ६ व ७ मेच्या रात्री भारताने फक्त पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले होते.