नवी दिल्ली : वस्तू व सेवा करातील (जीएसटी २.०) नवी द्विस्तरीय दररचना सोमवारपासून (दि.२२) लागू होत आहे. अप्रत्यक्ष करातील ही सुधारणा म्हणजे ‘बचत उत्सव’ असून त्यामध्ये देशवासीयांना सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरचित्रवाणीवरून रविवारी देशाला उद्देशून केलेल्या वीस मिनिटांच्या भाषणामध्ये केले.
केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षापासून वार्षिक १२ लाखांचे उत्पन्न करमुक्त केले आहे. शिवाय, ‘जीएसटी २.०’च्या सुलभीकरणामुळे दैनंदिन वापराच्या ९९ टक्के वस्तू ५ टक्के कर टप्प्यात आल्या आहेत. या दोन्हींचा एकत्रित परिणाम पाहिला तर गेल्या वर्षभरात जनतेची २.५ लाख कोटी रुपयांहून अधिक बचत होऊ शकेल. त्याचा सर्वाधिक लाभ गरिबीतून आत्ताच बाहेर आलेल्या २५ कोटी नव मध्यमवर्गाला होणार असल्याचा दावा मोदींनी केला. ‘जीएसटी’तील नवी सुधारणांमधून ‘नागरिक देवो भव’ हा मंत्र दिला आहे, असा दावा मोदींनी केला.
‘जीएसटी’चे शून्य, ५, १२, १८ व २४ टक्के असे पाच दरटप्पे होते. त्यामध्ये नुकतेच सुलभीकरण करण्यात आले असून ५ व १८ हे दोनच दरटप्पे कायम ठेवण्यात आले आहेत. अन्नपदार्थ, औषधे, साबण, टूथब्रश, टूथपेस्ट, आरोग्य व जीवनविमा अशा अनेक वस्तूंवर करमाफ असेल वा फक्त ५ टक्के कर आकारला जाईल. ‘जीएसटी’चे दर कमी झाल्यामुळे लोकांना वैयक्तिक स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. मग, ते घर बांधणे असो, टीव्ही वा फ्रीज खरेदी करणे असो वा स्कूटर, बाइक, कार खरेदी करणे असो. या वस्तू आता त्यांना स्वस्तात मिळू शकतील. सर्वसामान्यांना प्रवासही परवडणारा असेल. कारण बहुतांश हॉटेल खोल्यांवरील जीएसटीचे दर कमी झालेले आहेत, असे सांगत मोदींनी देशांतर्गत बाजारपेठेला चालना मिळण्याचा आशावाद व्यक्त केला.
अनेक परदेशी वस्तू नकळत आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनल्या आहेत. आपल्या खिशातील कंगवा परदेशी की स्वदेशी, हेही कोणाला आता माहीत नाही. अशा परावलंबनातून मुक्त झाले पाहिजे. भारतीय बनावटीच्या वस्तू लोकांनी खरेदी केल्या पाहिजेत. प्रत्येक घर स्वदेशीचे प्रतीक बनले पाहिजे आणि प्रत्येक दुकान स्वदेशी वस्तूंनी सजले पाहिजे, असे आवाहन मोदींनी केले. आपापल्या प्रदेशातील उत्पादनक्षमता वाढवावी आणि गुंतवणुकीला पोषक वातावरण निर्माण करावे. केंद्र व राज्ये एकत्रितपणे पुढे गेली तर आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल, प्रत्येक राज्य विकसित होईल आणि भारत विकसित राष्ट्र बनेल, असा दावा मोदींनी केला.
‘जीएसटी’च्या या नव्या सुधारणांमुळे देशाच्या आर्थिक इतिहासातील नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे. अनेक दशकांपासून देशवासीयांना व व्यापाऱ्यांना करांच्या जंजाळात अडकवले गेले होते. एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये माल घेऊन जाणे कटकटीचे होते. हा मनस्ताप टाळण्यासाठी काही कंपन्या माल देशाबाहेर घेऊन जात व पुन्हा तोच माल भारतात आणत.
ही प्रक्रिया त्यांना अधिक सोपी वाटत होती, असे मोदी म्हणाले. त्यासाठी मोदींनी परदेशी वृत्तपत्रामध्ये छापून आलेल्या यासंदर्भातील बातमीचे उदाहरण दिले. एका कंपनीने माल बेंगळूरुहून हैदराबादला थेट न नेता, तो आधी युरोपला पाठवला व तिथून तो हैदराबादला आयात केला. आता करांचे सुलभीकरण झाल्यामुळे मालवाहतूक स्वस्त झाली आहे, त्याचा लाभ अंतिमतः गरीब व मध्यमवर्गाला मिळेल, असे मोदी म्हणाले. एक देश, एक कररचना हे स्वप्न राज्यांच्या सहमतीने पूर्ण करता आले, असेही मोदींनी सांगितले.
स्वदेशीचा गर्व बाळगा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणामध्ये थेट अमेरिकेचा उल्लेख टाळला असला तरी, देशाने आत्मनिर्भर झाले पाहिजे. स्वदेशी वस्तूंचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. स्वदेशी वस्तू वापरल्याचा गर्व बाळगला पाहिजे, असा संदेश मोदींनी दिला. स्वदेशी वापराच्या धोरणामुळे देशाच्या उत्पादन क्षेत्राचा कणा असलेल्या सूक्ष्म व लघू उद्योगांना मोठी चालना मिळेल, अशी ग्वाहीही मोदींनी दिली.
‘मी स्वदेशी खरेदी करतो, मी स्वदेशी विकतो’ ही भावना प्रत्येक देशवासीयांच्या मनात रुजली पाहिजे. तर विकासाला गती मिळेल. राज्य सरकारांनी ‘आत्मनिर्भर भारत’ आणि स्वदेशी मोहिमांना पाठबळ द्यावे. –नरेंद्र मोदी, पंतप्रधान