PM Modi Mann ki Baat: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हिंदी विरुद्ध मराठी हा वाद चर्चेत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचा दर महिन्याला होणारा ‘मन की बात’ हा कार्यक्रम मराठीतून शेअर केला आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण ३२ मिनिटांचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाजात करण्यात आला आहे. @NaMoInMarathi या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून हा कार्यक्रम शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे एकीकडे महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांकडून हिंदीबाबत वेगळी भूमिका घेतली जात असताना दुसरीकडे पंतप्रधानांकडून मराठीतून कार्यक्रमाचा व्हिडीओ शेअर करण्यात आल्यामुळे चर्चेला सुरूवात झाली आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा #मनकीबात कार्यक्रम आता मराठीत त्यांच्याच आवाजात ऐकायला विसरू नका” असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. @SarvamAI चा वापर करून हे मराठीकरण करण्यात आल्याचंही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही पोस्ट रीशेअर केली आहे. “आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाजात मराठीमध्ये ‘मन की बात”, असं फडणवीसांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

‘मन की बात’मध्ये नरेंद्र मोदींचं कशावर भाष्य?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यंदाच्या मन की बात कार्यक्रमात देशभरातील अनेक प्रेरणादायी व्यक्तींचा वा संस्थांचा उल्लेख केला. रविवारी या कार्यक्रमाचा १२३वा भाग प्रसारित झाला. त्यात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उल्लेखापासून ते आणीबाणीच्या काळातील परिस्थितीपर्यंत अनेक मुद्द्यांवर मोदींनी भाष्य केलं.

“देशात आणीबाणी लागू करणाऱ्यांनी फक्त आपल्या संविधानाची हत्या केली नाही, तर देशाच्या न्यायपालिकेलाही आपली गुलाम बनवून ठेवण्याचा त्यांचा हेतू होता. या काळात जनतेला मोठ्या प्रमाणावर त्रास झाला. त्या घटना कधीही विसरता येणार नाहीत”, असं मोदी या कार्यक्रमात म्हणाले.

आंतरराष्ट्रीय योग दिनाचा केला उल्लेख

दरम्यान, यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय योग दिनी भारतासह जगभरात ठिकठिकाणी आयोजित कार्यक्रमांचाही उल्लेख केला. “२१ जून रोजी जगभरातील लोकांनी ठिकठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमात सहभाग घेतला. १० वर्षांपूर्वी याची सुरुवात झाली होती. गेल्या १० वर्षांत ही संकल्पना अधिकाधिक व्यापक होत गेली आहे”, असं त्यांनी नमूद केलं.