PM Narendra Modi On US President Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि हमासमध्ये गाझा पट्टीत सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. इस्रायल-हमासमध्ये शांतता निर्माण व्हावी म्हणून यासाठी ट्रम्प यांनी २० कलमी कार्यक्रम तयार केला आहे. तसेच हा प्रस्ताव स्वीकारण्याचं आवाहन ट्रम्प यांनी इस्रायल आणि हमासला केलं होतं. इस्रायलने हा प्रस्ताव मान्य केला, तसेच हमासनेही या प्रस्तावातील काही अटी मान्य केल्या आहेत. त्यामुळे ट्रम्प यांच्या प्रयत्नाला यश येत असल्याचं दिसून येत आहे.

या सर्व घडामोडींबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाझा शांतता करारातील डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेचं कौतुक करत इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांचंही तोंडभरून कौतुक केलं आहे. इस्रायली पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्या मजबूत नेतृत्वाचं हे प्रतिबिंब असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

गेल्या जवळपास दोन वर्षांपासून इस्रायल आणि हमासमध्ये हा संघर्ष सुरू होता. मात्र, अखेर दोन वर्षांनंतर हे युद्ध संपवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या शांतता योजनेचा भाग म्हणून इस्रायल आणि हमास यांनी ओलिसांच्या सुटकेसाठी सहमती दर्शविली असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी आज घोषित केलं. त्यानंतर भारताचे पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं?

“मला हे जाहीर करताना खूप अभिमान वाटतो की इस्रायल आणि हमास दोघांनीही आमच्या शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यावर स्वाक्षरी केली आहे. याचा अर्थ असा की सर्व बंधकांना लवकरच सोडण्यात येईल आणि इस्रायल मजबूत, टिकाऊ आणि शाश्वत शांततेच्या दिशेने पहिलं पाऊल म्हणून त्यांचं सैन्य एका मान्य रेषेवर माघारी घेईल. हा दिवस इस्रायल आजूबाजूच्या सर्व राष्ट्रांसाठी आणि अमेरिकेसाठी एक महत्वाचा दिवस आहे. तसेच आम्ही कतार, इजिप्त आणि तुर्कीमधील मध्यस्थांचे देखील आभार मानतो, ज्यांनी ही ऐतिहासिक आणि अभूतपूर्व घटना घडवून आणण्यासाठी आमच्याबरोबर काम केलं. शांतता प्रस्थापित करणारे धन्य आहेत”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

२० कलमी प्रस्तावात काय आहे?

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, या प्रस्तावातील तरतुदी गाझा प्रशासनानं मान्य करण्यावर युद्धबंदी अवलंबून असेल. त्यात प्रामुख्याने गाझामधील हमासच्या दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या इस्रायलच्या नागरिकांना जिवंत इस्रायलच्या हवाली करण्याचा मुद्दा समाविष्ट आहे. तसेच, आगामी काळात हमासचा गाझाच्या प्रशासनात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नसेल, असंही नमूद करण्यात आलं आहे. ट्रम्प यांनी मांडलेला हा २० कलमी प्रस्ताव त्यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या नवीन गाझा उभारण्याच्या उद्देशाचा एक भाग असल्याचं सांगण्यात आलं आहे. युद्धबंदीसाठी मध्यस्थी करणाऱ्या मध्यस्थांना या मुद्द्यांवर दोन्ही बाजूच्या प्रमुखांशी चर्चा सुरू आहे.