PM Narendra Modi Remark on Congress : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला प्रचंड मोठं यश मिळालं आहे. तर, महाआघाडीला पराभव स्वीकारावा लागला आहे. या निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपाने ८९, जदयूने ८५, लोजपाने (रामविलास) १९ जागा जिंकल्या आहेत. एनडीएने एकूण २०२ जागा जिंकत बिहारमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती केली आहे. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी नवी दिल्ली येथे संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रीय जनता दल व काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “बिहारच्या लोकांनी विकसित आणि समृद्ध बिहारसाठी मतदान केलं आहे. निवडणुकीवेळी मी जनतेला विक्रमी मतदान करण्याचा आग्रह केला होता आणि बिहारच्या जनतेने मतदानाचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. प्रामुख्याने महिलांनी ही निवडणूक हाती घेतली होती. मी बिहारच्या जनतेला एनडीएला प्रचंड बहुमत देण्याचा आग्रह केला होता आणि जनतेने आता आमच्या झोळीत बहुमत टाकलं आहे.
आगामी काळात काँग्रेसचं विभाजन होईल : पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दावा केला की “बिहारमध्ये भाजपाने जितक्या जागा जिंकल्या आहेत तितक्या जागा काँग्रेसला मागील सहा राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मिळून जिंकता आलेल्या नाहीत. ते आता केवळ नकारात्मकता पसरवण्याचं राजकारण करत असतात. कधी चौकीदार चोर है चा नारा देतात, कधी संसदेत गोंधळ घालून संसदेचा मौल्यवान वेळ वाया घालवतात, प्रत्येक संस्थेवर हल्ला करत असतात, कधी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करतात, कधी निवडणूक आयोगाला शिवीगाळ करतात, तर कधी मतचोरीचा आरोप करतात. ते देशाच्या शत्रूचं धोरण पुढे नेऊ पाहतायत.”
“काँग्रेसकडे देशासाठी कोणताही सकारात्मक दृष्टीकोन नाहीये. आज काँग्रेस मुस्लीम लीग माओवादी काँग्रेस अर्थात एमएमसी बनली आहे. परिणामी काँग्रेसमध्येदेखील एक वेगळा प्रवाह तयार होतोय, जो या नकारात्मक धोरणाच्या विरोधात आहे. त्यामुळे कदाचित येत्या काळात काँग्रेसचं विभाजन होऊ शकतं.
पंतप्रधानांच्या टीकेला काँग्रेसचं उत्तर
दरम्यान, मोदी यांच्या या टीकेला काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सावंत यांनी एक्सवर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “काँग्रेसमुक्त भारताचं स्वप्न बघणारे नरेंद्र मोदी गेली ११ वर्षे सगळ्या राष्ट्रीय तपास यंत्रणा लावून आणि संविधानिक संस्था वापरून, व्होट चोरी करून अयशस्वी ठरले. काँग्रेस पक्ष १४० वर्षे सगळी वादळे सहन करुन टिकून राहिला आहे.
सावंत म्हणाले, “आम्ही इंग्रजांच्या विरुद्ध लढताना घाबरलो नाही तर तुम्ही कोण आलात? काँग्रेस विभाजित करण्याचा कितीही प्रयत्न करा. काँग्रेस ही जनचळवळ आहे. समुद्रात काठी मारल्याने समुद्र विभाजित होत नाही. बरं, इतिहासात डोकवा मुस्लीम लीगविरोधात काँग्रेस लढली. तुमच्या पूर्वजांनी त्यांच्यासमवेत सरकारे स्थापन केली होती. इतके तुमचे मुस्लिम लीगवर प्रेम होते. तुम्ही संविधान व लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत रहा, आम्ही राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली संविधानाच्या व लोकशाहीच्या संरक्षणासाठी प्राणाची बाजी लावत राहू.”
