PM Narendra Modi Bihar Assembly Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भारतीय जनता पार्टी, संयुक्त जनता दल व एनडीएतील त्यांचे मित्रपक्ष, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल व त्यांच्या महागठबंधनमधील मित्रपक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. नितीश कुमार, तेजस्वी यादव, प्रशांत किशोर हे बिहारच्या वेगवेगळ्या भागांमध्ये फिरत आहेत, प्रचार करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील प्रचारात मागे राहिलेले नाहीत. ते देखील बिहारमध्ये भाजपासह एनडीए उमेदवारांचा प्रचार करत आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२ नोव्हेंबर) बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील आरा शहरात प्रचारसभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी काँग्रेस व राजदप्रणित महागठबंधनवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी मोदी म्हणाले, “काँग्रेस व राजदमध्ये सारंकाही आलबेल नाही. त्यांच्यात घमासान युद्ध चालू आहे. केवळ एकमेकांची डोकी फोडायची बाकी आहेत. निवडणुकीनंतर हे लोक एकमेकांना खायला उठतील. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहा. हे लोक बिहारचा विकास करू शकत नाहीत.
मी तुम्हाला आतली गोष्ट सांगतोय : नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आपली राष्ट्रीय लोकशाही (एनडीए) आघाडी आज विकसित बिहारच्या संकल्पासह संपूर्ण एकजुटीने पुढे जात आहे आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलामध्ये (राजद) घमासान युद्ध चालू आहे. मी तुम्हा सर्वांना एक आतली गोष्टी सांगतोय. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या एक दिवस आधी बिहारमध्ये बंद दाराआड गुंडगिरीचा खेळ खेळण्यात आला.”
“काँग्रेसच्या कानपट्टीवर बंदूक ठेवून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करायला सांगितलं’
“काँग्रेस व राजदमध्ये नुकतीच चर्चा झाली. खरंतर मुख्यमंत्रिपदासाठी राजदच्या नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब व्हावं अशी काँग्रेसची कधीच इच्छा नव्हती. परंतु, राजदनेही संधी सोडली नाही. राजदने काँग्रेसच्या कानपट्टीवर बंदूक ठेवून मुख्यमंत्रिपदाची चोरी केली. त्यांनी काँग्रेसलाच घोषणा करायला लावली. जबरदस्तीने मुख्यमंत्रिपदासाठी राजदच्या उमेदवाराला समर्थन देत असल्याची घोषणा करायला लावली. कानपट्टीवर बंदूक ठेवून वदवून घेतलं.”
राजद काँग्रेसला विचारत नाही : मोदी
“मित्रांनो मी तुम्हाला सांगतोय ते लक्षात ठेवा राजद व काँग्रेसमध्ये मोठं भांडण चालू आहे. महागठबंधनने जो निवडणुकीच्या आश्वासनांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे तो बनवताना राजदनं काँग्रेसचं काहीच ऐकलं नाही. प्रचार करताना देखील त्यांनी काँग्रेसला विचारलं नाही.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, निवडणुकीच्या आधी काँग्रेस व राजदमध्ये इतकी घृणा वाढली आहे की निवडणुकीनंतर हे लोक एकमेकांची डोकी फोडतील. लक्षात ठेवा, हे असे लोक कधीच बिहारचं भलं करू शकणार नाहीत.
