अहमदाबाद : नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्या राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेतील सहभागावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी काँग्रेसवर पुन्हा टीकास्त्र सोडले. गुजरातवासीयांचा विश्वास जिंकण्यासाठी काँग्रेसने आपले ‘फोडा आणि राज्य करा’ हे  धोरण सोडले  पाहिजे, असा सल्लाही मोदींनी दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भावनगर जिल्ह्यातील पालिताना शहरात भाजप उमेदवारांसाठीच्या प्रचारसभेत बोलताना मोदी म्हणाले, की गुजरातमधील जनतेने काँग्रेसला नाकारले आहे. कारण एक प्रदेश किंवा समुदायाला दुसऱ्या समुदायाविरुद्ध भडकावण्याच्या काँग्रेसच्या धोरणामुळे गुजरातचे खूप नुकसान झाले. ‘फूट पाडा व राज्य करा’ ही काँग्रेसची विचारधारा आहे. गुजरात स्वतंत्र राज्य होण्याआधी काँग्रेसने गुजराती व मराठी जनतेस एकमेकांविरुद्ध लढवले. त्यानंतर काँग्रेसने विविध जातींना परस्परांविरुद्ध भडकावले. काँग्रेसच्या अशा पापांनी गुजरातला खूप त्रास सहन करावा लागला. गुजरातच्या चतुर जनतेला काँग्रेसची ही रणनीती समजली. ते अशा विघटनकारी शक्तींना बाहेरचा दरवाजा दाखवण्यासाठी एकत्र आले.

काँग्रेस हरत आहे कारण गुजरातवासीयांनी त्यांच्याविरुद्ध एकजूट दाखवली. भाजप सत्तेत आल्यानंतर परिस्थिती बदलली. गुजरात गेल्या २० वर्षांपासून विकास करत आहे. भारत तोडू इच्छिणाऱ्या घटकांना पाठिंबा देणाऱ्यांना गुजरातवासीय मदत करण्यास तयार नाहीत. नर्मदेचे पाणी सौराष्ट्रातील दुष्काळग्रस्त प्रदेशापर्यंत पोहोचवण्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरदार सरोवर धरण प्रकल्प ४० वर्षे रखडवणाऱ्या व्यक्तीला गुजरातची जनता कधीही माफ करणार नाही, असेही मोदींनी सांगितले. १८२ सदस्य असलेल्या गुजरात विधानसभेसाठी १ व ५ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi slams congress over medha patkar s participation in bharat jodo yatra zws