PM Narendra Modi on Pakistan: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी गुजरातमधील स्टॅच्यु ऑफ युनिटी अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १८२ मीटर उंचीच्या पुतळ्याला पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली. राष्ट्रीय एकदा दिनाच्या निमित्ताने त्यांनी जमलेल्या लोकांसोबत एकतेची शपथदेखील घेतली. यावेळी केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवर टीकास्र सोडलं. त्याचवेळी त्यांनी काँग्रेसलादेखील लक्ष्य केलं.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

राष्ट्रीय एकदा दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेजारी राष्ट्र पाकिस्तानवर हल्लाबोल केला. आपल्या शत्रूंना भारताकडून आता निर्णायक, सक्षम आणि अवघ्या जगाला दिसून येईल असं प्रत्युत्तर दिलं जाईल, असं मोदी यावेळी म्हणाले. तसेच, त्यांनी यावेळी पाकिस्तानला इशारादेखील दिला.

“ऑपरेशन सिंदूरदरम्यान अवघ्या जगानं हे पाहिलं की जर कुणीही भारताकडे वाकड्या नजरेनं पाहिलं, तर भारत घरात घुसून मारतो. आज पाकिस्तान आणि दहशतवादाच्या हस्तकांना हे कळलं असेल की भारताचं खरं सामर्थ्य काय आहे”, असं मोदी यावेळी म्हणाले.

काँग्रेस सरदार पटेलांचे विचार विसरली – मोदी

दरम्यान, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर सरकार वल्लभभाई पटेल यांचे विचार विसरल्याचा आरोप केला. “सरदार पटेल यांचे आदर्श विचार शासन कारभाराबाबत अनेक बाबतीत मार्गदर्शन करतात. त्यात फक्त बाह्य शत्रूंविरोधातील सरकारची भूमिकाच नव्हे, तर नक्षलवाद आणि घुसखोरीसारख्या अंतर्गत शत्रूंचा सामना करण्याबाबतचेही विचार आहेत”, असं मोदी म्हणाले.

“२०१४ पूर्वी नक्षलवादी देशाच्या मोठ्या भागात त्यांचं स्वत:चं राज्य चालवायचे. शाळा, कॉलेज, रुग्णालये जाळून टाकली जायची. प्रशासन असहाय झालं होतं. पण आम्ही शहरी नक्षलवादाविरोधात कठोर कारवाई केली. आज त्याचे परिणाम दिसून येत आहेत. आधी १२५ जिल्ह्यांमध्ये पसरलेला नक्षलवाद्यांचा प्रभाव आता ११ जिल्ह्यांपर्यंत मर्यादित झाला आहे. शिवाय, नक्षलवाद्यांचं अस्तित्व अवघ्या ३ जिल्ह्यंपुरतं केंद्रीत झालं आहे”, असं मोदी म्हणाले.

“मतांसाठी आधीच्या सरकारने…”, मोदींची टीका

“फक्त व्होटबँकेच्या राजकारणासाठी आधीच्या सरकारांनी राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात टाकली. जे घुसखोरांसाठी आज भांडत आहेत, त्यांना देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेशी काहीही देणंघेणं नाही. पण जर देशाची सुरक्षा धोक्यात असेल, तर प्रत्येक नागरिकाचीही सुरक्षा धोक्यात आहे”, असं नरेंद्र मोदींनी यावेळी नमूद केलं.