नोटाबंदीवरुन बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रहार केला आहे. हिंमत असेल तर लोकसभा बरखास्त करा आणि पुन्हा निवडणुका घ्या असे आव्हानच मायावतींनी मोदींना दिले आहे.

नोटाबंदीच्या निर्णयावरुन गुरुवारीही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांनी गोंधळ घातला. बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी थेट नरेंद्र मोदींनाच आव्हान दिले. मोदींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी पुन्हा निवडणुका घ्यावात असे त्यांनी म्हटले आहे. सभागृहात नोटाबंदीवरुन  गोंधळ सुरु आहे. विरोधकांना उत्तर हवे. पंतप्रधान चर्चेपासून का पळत आहे, त्यांनी संसदेतील चर्चेत सहभाग घ्यावा असे त्या म्हणाल्यात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीवरुन जनतेचे मत जाणून घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मोदींच्या अॅपवर मत नोंदवता येणार आहे. यावरुनही मायावती यांनी मोदींवर टीका केली. हा अॅप बनावट असल्याची टीका त्यांनी केली.  नोटाबंदीवर जनमत जाणून घेण्यासाठी सुरू केलेल्या अॅपवर आतापर्यंत पाच लाख लोकांनी मते व्यक्त केली असून ९३ टक्के जनतेने या निर्णयाचे समर्थन केल्याचा दावा सरकारने केला आहे. भ्रष्टाचार व काळ्या पैशाविरोधात लढाई आवश्यक असल्याचे मत ९९ टक्के लोकांनी नोंदवले आहे. ९० टक्के लोकांनी सरकारने काळा पैसा रोखण्यासाठी पाऊल उचलले पाहिजे असे मत व्यक्त केले आहे. ९२ टक्के लोकांनी भ्रष्टाचारविरोधात मोदी सरकारचे प्रयत्न योग्य असल्याचे म्हटले आहे. ९० टक्के लोकांनी ५०० व १००० रूपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. तर ९२ टक्के लोकांच्या मते या निर्णयामुळे काळे धन, भ्रष्टाचार आणि दहशतवादावर लगाम लावण्यास मदत मिळेल असे म्हटले आहे. या सर्वेक्षणात ५०० व १००० रूपयांच्या जुन्या नोटा बंद करण्यासंबंधीचे प्रश्न विचारण्यात आले होते.

हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाल्यापासून विरोधकांनी पंतप्रधानांनी संसदेत येऊन नोटाबंदीवर बोलावे, अशी मागणी लावून धरली आहे. या प्रमुख मागणीसाठी विरोधकांनी गेल्या गुरुवारपासून दोन्ही सभागृहांमध्ये कामकाज होऊ दिलेले नाही.गुरुवारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राज्यसभेत बोलू न दिल्याने काँग्रेस खासदार आक्रमक झाले. माजी पंतप्रधानांना बोलू देणे अशोभनीय असल्याचे त्यांनी सांगितले. तर आम्ही मनमोहन सिंग यांना रोखले नाही, आम्ही त्यांचा आदर करतो असे व्यंकय्या नायडू यांनी सांगितले.

चोर मचाये शोर

नोटाबंदीच्या निर्णयावरुन भाजप नेत्यांचे वादग्रस्त वक्तव्य करण्याची मालिका सुरुच आहे. गुरुवारी यामध्ये केंद्रीय मंत्री उमा भारती यांची भर पडली. नोटाबंदीच्या निर्णयाने जनता खूश आहे, ज्यांचा काळा पैसा नोटेच्या रुपात होता त्यांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. चोर मचाये शोर असे सांगत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. पण उमा भारतींचे हे विधान आता वादाच्या भोव-यात सापडण्याची चिन्हे आहेत.