भाजप नेतृत्वाच्या जवळ असल्याचे स्पष्ट
‘मुख्यमंत्र्यांना अवगत केले’ असा शेरा लिहिल्याने अडचणीत आलेले व सध्या चौकशीची टांगती तलवार असलेले गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्याकडे भाजपने गुजरातमधील निवडणूक प्रचाराची जबाबदारी सोपविली आहे. मुख्यमंत्र्यांची खप्पामर्जी झाली तरी मेहता हे भाजप नेतृत्वाच्या जवळ असल्याचे त्यातून स्पष्ट होते.
दक्षिण मुंबईत एका विकासकाला मदत व्हावी म्हणून गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी निर्णय घेतल्याचा आरोप झाला होता. ‘मुख्यमंत्र्यांना अवगत केले’ हा शेरा त्यांना चांगलाच महागात पडला होता. या शेऱ्याबद्दल विरोधकांनी पावसाळी अधिवेशनात मेहता यांना लक्ष्य केले होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी मेहता यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी मेहता यांची लोकायुक्तांमार्फत चौकशी करण्याचे जाहीर केले होते. विनोद तावडे, पंकजा मुंडे, गिरीश बापट आदी मंत्र्यांवर आरोप झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी या साऱ्या मंत्र्यांना अभय दिले होते. पण मेहता यांची चौकशी करण्यात येईल, असे जाहीर केल्याने वेगळा संदेश गेला होता.
आगामी मंत्रिमंडळाच्या विस्तारात मेहता यांना धक्का दिला जाईल, अशी भाजपमध्ये चर्चा असली तरी गुजरातमधील निवडणुकीत भाजपने त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. सूरत, राजकोटमध्ये प्रचाराचे नियोजन किंवा प्रचारात सहभागी झाल्यावर मेहता हे सध्या उना या त्यांच्या मूळ गावी प्रचार करीत आहेत. आणखी दोन दिवसाने त्यांच्याकडे नव्या मतदारसंघांची जबाबदारी सोपविली जाईल.
‘पक्षाने सोपविलेल्या जबाबदारीनुसार त्या त्या मतदारसंघांचा दौरा करीत आहे. सध्या उना येथे प्रचारात सहभागी झालो आहे. गुजरातची निवडणूक संपेपर्यंत मधला काही अपवाद वगळता प्रचारात सहभागी होणार असल्याचे मेहता यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. आपल्या खात्याच्या कामावर काहीही परिणाम होणार नाही याची खबरदारी घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अन्य मंत्र्यांना अभय देणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी मेहता यांच्या चौकशीची घोषणा का केली, असा सवाल तेव्हा उपस्थित झाला होता. भाजपच्या वर्तुळात मेहता हे भाजप नेतृत्वाच्या निकटवर्तीयांमधील मानले जातात. एखाद्या नेत्याची चौकशी किंवा त्याच्यावर आरोप झाल्यावर पक्षात फार महत्त्व दिले जात नाही. माजी मंत्री व ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे त्याचे उदाहरण आहे. लोकायुक्तांमार्फत चौकशीची घोषणा झाली तरीही मेहता यांच्यावर पक्षाने गुजरातमध्ये प्रचाराची जबाबदारी सोपवून त्यांच्यावर विश्वासच व्यक्त केला आहे, असे भाजपमध्ये बोलले जाते.
पहिल्या टप्प्यात १,७०३ उमेदवारी अर्ज
अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील ८९ जागांसाठी १,७०३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. बहुतांश सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधील १९ जिल्ह्यांतील ८९ मतदारसंघांत पहिल्या टप्प्यात ९ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. राष्ट्रीय पातळीवरील पक्षांच्या ५२३ उमेदवारांसह ७८८ अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. उर्वरित ३९२ उमेदवार राज्यस्तरीय पक्ष, छोटय़ा पक्षांचे आहेत.
सिब्बल यांच्याकडून आभार
नवी दिल्ली : हार्दिक पटेलने पाठिंबा दिल्याबद्दल काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी आभार मानले आहेत. भाजपला सत्तेतून हटविण्यासाठी सर्वानी एकत्र येण्याची गरज असल्याचे सिब्बल यांनी स्पष्ट केले. पटेल आरक्षणाबाबत विचारले असता विस्ताराने बोलण्याचे त्यांनी टाळले. या बाबी नंतर ठरविल्या जातील असे त्यांनी स्पष्ट केले. गुजरात निवडणुका जिंकण्यास प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसचा प्रस्ताव विनोदच -नितीन पटेल
अहमदाबाद : काँग्रसने पाटीदारांना आरक्षणासाठी जो प्रस्ताव दिला आहे तो मोठा विनोद आहे. हार्दिक पटेलने समाजाची दिशाभूल केली आहे, असा आरोप गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारी नोकऱ्या व शिक्षण संस्थांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक राखीव जागा असता कामा नयेत. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी हार्दिक पटेलची दिशाभूल केली. पटेल समाज अशा प्रलोभलांना बळी पडणार नाही, असा दावा नितीन पटेल यांनी केला.
