गेल्या महिन्याभरात महाराष्ट्र आणि बिहार या देशातील दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या राज्यांमध्ये मोठे राजकीय बदल दिसून आले. एकीकडे महाराष्ट्रात शिवसेनेतील बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आलं. तर दुसरीकडे बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपासोबतच्या आघाडीतून बाहेर पडत पुन्हा एकदा लालूप्रसाद यादव यांच्या राजदशी घरोबा केला. त्यामुळे तिथेही अवघ्या काही दोन दिवसांत आधीचं सरकार कोसळून नवीन सरकार अस्तित्वात आलं. पण मुख्यमंत्री मात्र पुन्हा एकदा नितीश कुमारच झाले. या पार्श्वभूमीवर बिहारमधील राजकारण प्रचंड दोलायमान झालेलं असताना निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी बिहारबाबत मोठं भाकित केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिहारमध्ये नेमकं काय घडलं?

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अवघ्या काही महिन्यांपूर्वी ज्या पक्षासोबत ते पुन्हा सत्तेत आले, त्या भाजपाची साथ सोडली. भाजपाकडून सहकार्य होत नसल्याचा दावा करत नितीश कुमार युतीतून बाहेर पडले आणि त्यांनी राजदशी हातमिळवणी करत राज्यात पुन्हा सरकार स्थापन केलं. मित्रपक्ष बदलला असला, तरी मुख्यमंत्रीपदी मात्र नितीश कुमार हेच कायम आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाकजून नितीश कुमार यांना लक्ष्य केलं जात असताना आता प्रशांत किशोर यांनी बिहारमधील राजकीय परिस्थितीबाबत मोठं भाकित वर्तवलं आहे.

“कुठून देणार १० लाख नोकऱ्या?”

बुधवारी बिहारच्या समस्तीपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना प्रशांत किशोर यांनी यासंदर्भात वक्तव्य केलं आहे. “हा सगळा जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रकार आहे. हे महागठबंधनचं सरकार जर पुढच्या एक-दोन वर्षांत १० लाख नोकऱ्या देऊ शकलं, तर मी आत्ता त्यांना समर्थन देईन. कुठून देणार नोकऱ्या? कारण त्यांना जनतेचं समर्थनच नाहीये. जनतेनं या युतीच्या नावाने मतच दिलेलं नाही”, असं प्रशांत किशोर म्हणाले.

“नितीश कुमार फेविकॉल लावून बसलेत”

“नितीश कुमार फेविकॉल लावून बसले आहेत. ज्यांना इकडून तिकडे जायचं असेल, बदलायचं असेल त्यांनी हवं ते करावं. आम्ही बसलोय फेविकॉल लावून. त्यांनी १० लाख लोकांना नोकऱ्या दिल्या, तर आत्ता आम्ही सगळी टीका मागे घेऊ आणि त्यांना नेता मानू. थेट जनतेला मूर्ख बनवण्याचं काम आहे. जे नोकरीवर आहेत, त्यांना पगार देऊ शकत नाहीयेत आणि तुम्ही म्हणत आहात की १० लाख लोकांना नोकऱ्या देणार”, अशा शब्दांत प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांच्यावर टीका केली.

“हे सगळं पुन्हा बदलेल, कारण…”

“नितीश कुमार यांना पुन्हा संधी मिळाली. त्यांना सत्तेत येऊ तीनच महिने झाले होते. पण आता बघा, पूर्ण १८० अंशात सगळं बदललं. आता कुणास ठाऊक पुन्हा कसं फिरेल. तुम्हाला एवढं सांगून जातो, की पुढच्या निवडणुकांच्या आधी हे पुन्हा अनेकदा फिरेल. मी ही भविष्यवाणी करून जातोय. कारण या युतीला जनतेचं समर्थनच नाहीये”, असंही प्रशांत किशोर यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prashant kishir targets bihar cm nitish kumar predicts political reshuffle pmw
First published on: 18-08-2022 at 10:39 IST