पीटीआय, जयपूर

‘‘काँग्रेस घराणेशाहीच्या दुष्टचक्रात अडकलेला पक्ष असून, त्यामुळेच या पक्षाचे अनेक जण हा पक्ष सोडून जात आहे. काँग्रेस भविष्याचा वेध घेऊ शकत नाही आणि त्यासाठी त्यांच्याकडे कोणतीही कृतियोजनाही नाही. फक्त ‘मोदीविरोध’ एवढीच त्यांची एकसूत्री भूमिका आहे,’’ अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली. ‘विकसित भारत-विकसित राजस्थान’ कार्यक्रमास दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करताना मोदी बोलत होते.

मोदी म्हणाले, की पराकोटीचा मोदीविरोध हेच काँग्रेसचे एकमेव धोरण आहे. मोदींच्या विरोध करताना समाजात फूट पडेल, अशा खोटय़ा गोष्टी ते पसरवतात. सध्या सर्व जण काँग्रेस सोडत आहेत. काँग्रेसचा कारभार एकाच कुटुंबाकडे एकवटलेला दिसत आहे. हे राजकारण भारतातील तरुणाईला अजिबात प्रेरक नाही. दूरगामी विचार करून सकारात्मक धोरणे बनवू शकत नाही, ही काँग्रेसची समस्या आहे. काँग्रेसच्या या विचारसरणीमुळे भारताची विद्युत यंत्रणा बदनाम झाली.

हेही वाचा >>>‘काही निधर्मी वगळता गेल्या १० वर्षांत अनेक भारतीय जातीयवादी झाले’, काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांचे विधान

विकसित भारत घडवण्यासाठी आम्ही देशातील तरुण, महिला, शेतकरी आणि गरीब या चार घटकांना मजबूत करण्यासाठी प्रयत्नरत आहोत. आमच्यासाठी याच चार सर्वात मोठय़ा जाती आहेत. मला आनंद आहे की ‘डबल इंजिन’ सरकार या वर्गाच्या सक्षमीकरणासाठी ‘मोदींची हमी’ पूर्ण करत आहे.

ते म्हणाले की, राजस्थानच्या भाजप सरकारने आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात तरुणांसाठी ७० हजार रिक्त जागांवरील भरती जाहीर केली आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाकडे लक्ष वेधत मोदी म्हणाले, जेव्हा मोदी तुम्हाला दिलेल्या अशा हमींची पूर्तता करतात, तेव्हा काहींची झोप उडते. तुम्ही काँग्रेसची स्थिती पाहत आहात. नुकताच तुम्ही काँग्रेसला धडा शिकवला आहे. पण ते ते मान्य करत नाहीत. मोदींना जे सर्वाधिक शिव्या घालतात, त्यांना काँग्रेस जवळ घेते. मोदी ज्या विकसित भारतासाठी कार्यरत आहे, त्याचा उल्लेखही ते करत नाहीत असा आरोप मोदींनी केला.