अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २५ टक्के अतिरिक्त आयात शुल्क लागू करण्याच्या एक दिवस आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ‘स्वदेशी’ आणि ‘मेक इन इंडिया’चा जोरदार प्रचार केला. यामुळे देशात अधिकाधिक रोजगार निर्माण होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. तसेच ‘स्वदेशी’ हा प्रत्येकाचा जीवनमंत्र असला पाहिजे आणि कोणीही गुंतवणूक करत असले तरी, उत्पादन देशांतर्गतच झाले पाहिजे, असेही पंतप्रधान मोदी यांनी या वेळी सांगितले.
गुजरातमधील हंसलपूर येथील केंद्रातून १०० हून अधिक देशांमध्ये ‘मारुती सुझुकी’च्या पहिल्या इलेक्ट्रिक गाडीच्या (ई-विटारा) निर्यातीला मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. तसेच हायब्रिड इलेक्ट्रिक वाहनांसाठी लिथियम-आयन बॅटरी, विद्युतघट (सेल) आणि विद्धुताग्र (इलेक्ट्रोड) उत्पादन केंद्राचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. भारत-जपान संबंधांचे कौतुक करताना दोन्ही देश एकमेकांसाठी बनले आहेत, असे मोदी या वेळी म्हणाले.
केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाने जागतिक आणि देशांतर्गत उत्पादकांसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. जगात आता भारतात उत्पादित झालेल्या इलेक्ट्रिक गाड्या चालवल्या जातील, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. ‘माझी स्वदेशीची व्याख्या अतिशय सोपी आहे. : पैसे कोणाचे गुंतवले आहेत हे महत्त्वाचे नाही, ते डॉलर्स आहेत, पौंड आहेत, चलन काळे आहे की पांढरे आहे, हेही माझ्यासाठी महत्त्वाचे नाही. उत्पादनात घाम माझ्या देशवासीयांचा आहे हे महत्त्वाचे आहे. पैसा दुसऱ्याचा असू शकतो, पण घाम आपला आहे,’ असे मोदींनी ठामपणे सांगितले.
२०४७ पर्यंत आपण असा भारत निर्माण करू की तुमच्या भावी पिढ्यांना तुमच्या बलिदानाचा अभिमान वाटेल. तुमच्या योगदानाचा अभिमान वाटेल. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान.
७० हजार कोटींची गुंतवणूक
पुढील पाच ते सहा वर्षांत भारतामध्ये ७० हजार कोटींची गुंतवणूक करण्याचे आश्वासन, सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे प्रतिनिधी संचालक आणि अध्यक्ष तोशिहिरो सुझुकी दिले. तर ही गुंतवणूक कंपनीचे वार्षिक ४० लाख वाहन निर्मितीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी असेल, असे मारुती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आर. सी. भार्गव म्हणाले.