पीटीआय, नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी साडेतीनशेहून अधिक जागांवर विजय मिळवून तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करेल, असा अंदाज सर्वच मतदानोत्तर चाचण्यांमधून व्यक्त करण्यात आला आहे. सलग दहा वर्षे सत्तेत राहूनही भाजपविरोधी वातावरण नसल्याचा आणि विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीचा फारसा प्रभाव निकालांवर पडणार नसल्याचा अंदाज या चाचण्यांतून व्यक्त झाला आहे. नरेंद्र मोदी यांनीही या अंदाजांवर प्रतिक्रिया देताना ‘संधीसाधू’ आघाडी जनतेशी नाळ जोडण्यात अपयशी ठरली, असे म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान शनिवारी सायंकाळी पार पडल्यानंतर उघड झालेल्या सर्व संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांनी रालोआला सरासरी ३५०हून अधिक जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. विरोधी पक्षांची इंडिया आघाडी १२५ ते १५० पर्यंतचा आकडा गाठेल, असे या चाचण्यांत म्हटले आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत सरासरी १३ मतदानोत्तर चाचण्यांनी रालोआला ३०६ आणि काँग्रेसप्रणित संपुआला १२० जागांचा अंदाज व्यक्त केला होता. प्रत्यक्षात भाजपने ३०३ तर रालोआने ३५३ जागांवर विजय मिळवला होता. त्या विजयापेक्षाही अधिक जागा यंदा भाजपला मिळतील, असे यंदाचे अंदाज आहेत. येत्या चार जूनला मतमोजणीनंतर निकालाचे चित्र स्पष्ट होईल. भाजपच्या सलग तिसऱ्या विजयामध्ये हिंदी भाषिक पट्ट्यातील राज्यांतील घवघवीत यश प्रभावी ठरेल, असा मतदानोत्तर चाचण्यांचा अंदाज आहे. मात्र, त्याबरोबरच दक्षिण भारतात कर्नाटकखेरीज तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळ या राज्यांमध्ये भाजप नेत्रदीपक यश मिळवेल, असा सूर व्यक्त करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा दक्षिण भारतातील प्रचारावर विशेष लक्ष दिले होते. त्याचा भाजपला फायदा होईल, असा अंदाज चाचण्यांमधून व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>“पंतप्रधान मोदींनी ध्यानधारणा करून सूर्याला शांत केलं, त्यामुळे आता…”, खासदार रवी किशन यांचं वक्तव्य

उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा दबदबा

उत्तर प्रदेशातील ८० जागांपैकी रालोआ किमान ६० जागा जिंकेल असा अंदाज व्यक्त होत आहे. हा आकडा गतवेळच्या आकड्याच्या जवळपासच राहील, असे चित्र आहे. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या लोकप्रियतेच्या जोरावर राज्यातील भाजपची पकड मजबूत असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.

दक्षिणेत भाजपची मुसंडी

गेल्या निवडणुकीत दक्षिणेत भाजपला केवळ २९ जागा जिंकता आल्या होत्या. तुलनेत मतदानोत्तर चाचण्यांमध्ये २०२४ मध्ये भाजप कर्नाटकमध्ये गेल्या वेळच्या २५ जागांच्या तुलनेत तीन ते चार जागा गमावेल असे भाकित वर्तवण्यात आले आहे. मात्र तामिळनाडू, केरळ, तेलंगण व आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये भाजपची कामगिरी चांगली राहील अशी शक्यता आहे. विशेषत: केरळ तसेच तामिळनाडूत भाजपचे आपले खाते उघडेल असे संकेत या चाचण्यांतून मिळत आहेत. केरळमध्ये यश मिळवण्यासाठी भाजपची अनेक वर्षांपासून रणनिती यंदा कामी येताना दिसत आहे.

रालोआ इंडिया इतर

इंडिया न्यूज ३७१ १२५ ४७डी-डायनॅमिक्स

जनकी बात ३६२-३९२ १४१-१६१ १०-२०

न्यूज नेशन ३४२-३७८ १५३-१६९ २१-२३

रिपब्लिक भारत ३५३-३६८ ११८-१३३ ४३-४८

इंडिया टुडे ३४८ १६७ 0६

चाणक्य ४०० १०७ २९

कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सुरू केलेली ४५ तासांची ध्यानधारणा शनिवारी पूर्ण केली.पूर्ण आत्मविश्वासाने मी सांगतो की मतदारांनी विक्रमी संख्येने राष्ट्रीय लोकशाही आघाडीची पाठराखण केली आहे. विरोधकांना जनतेने पूर्णपणे नाकारले आहे. केवळ मोदी द्वेषावर त्यांचा प्रचार आधारित होता. ज्यांनी रालोआला मतदान केले त्यांचे मनापासून आभार. – नरेंद्र मोदीपंतप्रधान