अमेरिकेने एच-१बी व्हिसाबद्दल अचानक जाहीर केलेल्या नवीन आदेशामुळे, अमेरिकेत नोकरी करत असलेल्या अनेक भारतीयांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. जे लोक सुट्टीसाठी किंवा कुटुंबियांना भेटण्यासाठी मायदेशी आले आहेत, त्यांना शक्य तितक्या लवकर अमेरिकेत परतावे लागणार आहे. परंतु अद्याप बरेचजण अजूनही भारतात अडकले आहेत.

आम्ही वाचलो, पण…

तेलंगणातील एका महिलेने नाव न सांगण्याच्या अटीवर तिचे दुःख व्यक्त केले. “आम्हाला २१ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपूर्वी इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगण्यात आले होते. आम्ही ही प्रक्रिया तत्काळ पूर्ण केल्यामुळे वाचलो, परंतु आमचे बरेच मित्र भारतात आहेत आणि त्यांना अमेरिकेला येण्यासाठी विमाने मिळत नाहीत”, ती म्हणाली. याबाबात इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.

तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील अनेक लोक अमेरिकेत राहतात. तेलंगणाचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री श्रीधर बाबू यांनी या संदर्भात केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. त्यांनी सांगितले की, अमेरिकेतील ७० ते ७२ टक्के व्हिसा भारतीयांना दिले जातात आणि तेलंगणा व आंध्र प्रदेश यामध्ये आघाडीवर आहेत.

पत्नी भारतात आणि मी अमेरिकेत

एका व्यक्तीने सांगितले, “माझी पत्नी भारतात आहे आणि मी अमेरिकेत आहे. आम्ही पुन्हा कधी भेटू हे मला माहित नाही.” पुण्यातील एका आयटी इंजीनिअर सांगितले, “अमेरिकेतील प्रकल्पांचे ६० ते ७० टक्के काम भारतीय लोक करतात आणि याचा परिणाम आपल्या सर्वांवर होईल”, असेही इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटले आहे.

मी आता थकलो आहे

बोस्टनहून बोलताना, बेंगळुरू येथील एका व्यक्तीने सांगितले की, “माझा एच-१बी व्हिसा दोन वर्षांत संपत आहे. जर त्यांनी मला राहण्याची परवानगी दिली तर मी तिथेच राहीन. जर नाही तर मी परत येईन. व्हिसा मिळविण्यासाठी मी आधीच इतक्या अडचणींना तोंड दिले आहे की, मी यासाठी लढा देऊन थकलो आहे.”

एच-१बी व्हिसाचे सर्वाधिक लाभार्थी भारतीय

अमेरिकन एच-१बी व्हिसाचे सर्वाधिक लाभार्थी भारतीय आहेत. २०१५ पासून दरवर्षी मंजूर होणाऱ्या सर्व व्हिसांपैकी ७० टक्क्यांहून अधिक व्हिसा भारतीयांचे मंजूर होतात. यामध्ये २०१८ पासून सुमारे १२-१३ टक्के इतके चिनी नागरिक दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ऑक्टोबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ दरम्यान, जारी केलेल्या सुमारे ४००,००० व्हिसांपैकी ७२ टक्के व्हिसा भारतीय नागरिकांना मिळाले आहेत.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी एच-१बी व्हिसासाठी अर्जाचे शुल्क एक लाख डॉलर्सपर्यंत वाढवले आहे. यानंतर, मेटा, मायक्रोसॉफ्ट आणि अमेझॉनसह अनेक टेक कंपन्यांनी परदेशातील त्यांच्या कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवून रविवारी पहाटे १२:०१ वाजेपर्यंत अमेरिकेत परतण्यास सांगितले आहे.