पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सुल्तानपूर लोधीमधील काली बेईं नदीतील पाणी पिल्यानंतर दोन दिवसांनी त्यांना पोटदुखीच्या त्रासानंतर रुग्णालयात दाखल व्हावं लागलं. त्यामुळे नदीतील पाण्यामुळेच ते आजारी पडल्याची चर्चा आहे. त्यांचा नदीतील ग्लासभर पाणी पितानाचा व्हिडीओही व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या रुग्णालयात भगवंत मान यांच्या तपासणी करून उपचार सुरू आहेत. त्यांना तीव्र पोटदुखीचा त्रास होत आहे. मंगळवारी (१९ जुलै) चंदीगढमधील सरकारी निवासस्थानी पोटदुखी वाढल्याने त्यांना तातडीने दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुरुवातीला मान यांना दिल्लीत उपचारासाठी दाखल केल्याची माहिती गुप्त ठेवण्यात आली. कारण तातडीच्या उपचारासाठी त्यांना चंदीगढवरून संपूर्ण सुरक्षेशिवाय दिल्लीला आणलं गेलं होतं.

पोटदुखीनंतर भगवंत मान यांचा नदीतील पाणी पितानाचा व्हिडीओ व्हायरल

भगवंत मान यांना पोटदुखीचा त्रास नेमका का होतोय याबाबत चाचण्यांच्या अहवालानंतरच स्पष्टता येईल. मात्र, सध्या मान यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ ते रुग्णालयात दाखल होण्याआधी २ दिवसांचा आहे. त्यात ते पंजाबमधील काली बेई या नदीतील पाणी पिताना दिसत आहे.

हेही वाचा : Bhagwant Mann Wedding: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचं दुसऱ्यांदा लग्न, कोण आहे नवरी? वाचा…

या नदीला शिख धर्मात विशेष स्थान आहे. या नदीला गुरुनानक साहिब यांचा स्पर्ष झाल्याचं मानलं जातं. त्यामुळेच राज्यसभा खासदार सचेवल यांनी ही नदी स्वच्छ करण्याची जबाबदारी स्विकारली आहे. मान यांनी देखील पंजाबमधील नद्या स्वच्छ करण्याचा संकल्प घेतलाय. याच अभियानाचा भाग म्हणून त्यांनी या नदीतील पाणी पिलं होतं. या नदीत आजूबाजूच्या परिसरातील प्रदुषित पाणी, मैला सोडल्याचं बोललं जातंय. तसेच त्यातूनच भगवंत मान यांची तब्येत बिघडल्याचा दावाही केला जातोय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punjab cm bhagwant mann admitted in hospital days after drinking water from kali bein river pbs