IPS Officer DIG Harcharan Singh Bhulllar : केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) गुरुवारी लाचखोरीच्या प्रकरणात पंजाब पोलीस दलातील रोपर रेंजचे डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल (DIG) हरचरण सिंग भुल्लर यांना अटक केली होती. भुल्लर यांना कथितपणे आठ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलं होतं. या प्रकरणात न्यायालयाने भुल्लर यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे.
८ लाख रुपयांच्या लाचखोरीच्या प्रकरणात आता हरचरण सिंग भुल्लर यांच्यावर पंजाब सरकारने मोठी कारवाई केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी हरचरण सिंग भुल्लर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. भुल्लर यांना अटक झाल्यानंतर ४८ तास उलटून गेल्यानंतर कायद्यातील नियमांचा हवाला देऊन पंजाब सरकारने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली असल्याचं सांगण्यात आलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
या प्रकरणात भुल्लर यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ‘मला पूर्णपणे अडकवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. माझ्यावर पूर्णपणे चुकीचे आरोप लावण्यात आले आहेत’, अशी प्रतिक्रिया भुल्लर यांनी दिली आहे. ११ ऑक्टोबर रोजी दाखल तक्रारीनुसार, भुल्लर यांनी त्यांच्या एका मध्यस्थ व्यक्ती मार्फत एका प्रकरणात लाच मागितली असा आरोप आहे. तसेच पैसे न दिल्यास तक्रारदाराला फौजदारी प्रकरणांमध्ये अडकवण्याची धमकी दिली होती, असंही तक्रारीत म्हटलेलं आहे.
५ कोटींची रोकड, दीड किलो सोनं, २२ लग्झरी घड्याळं
भुल्लर यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी केल्यानंतर सीबीआयच्या हाती मोठं घबाड लागलं. याबाबत सीबीआयने गुरूवारी निवेदन दिलं आहे. यामध्ये सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितलं की, “५ कोटी रुपयांची रोकड, दीड किलो सोन्याची दागिने, २२ लग्झरी घड्याळे, ऑडी आणि मर्सिडिझ सारख्या आलिशान गाड्या, ४० लीटर उंची मद्याच्या बाटल्या, एक पिस्तूल, एक रिव्हॉलवर आणि एक डबल बॅरल बंदूक, तसेच दारूगोळ्यासह एक एअरगन जप्त करण्यात आली आहे.”
भंगार व्यापाराकडून ८ लाखांची लाच मागितल्याचा आरोप
डीआयजी भुल्लर २००७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. भुल्लर यांचे वडील महल सिंग भुल्लर पंजाबचे डीजीपी होते. भुल्लर यांच्या विरोधात एका भंगार व्यापाऱ्याने तक्रार दाखल केली होती. भंगार व्यापाऱ्याच्या विरोधात २०२३ साली दाखल झालेल्या एका एफआयआर संदर्भात भुल्लर यांनी लाच मागितली होती असा आरोप आहे. सीबीआय अधिकाऱ्यांनी चंदीगडच्या सेक्टर ४० मधील भुल्लर यांच्या निवासस्थानी छापेमारी केली. अटकेनंतर भुल्लर यांना चंदीगडच्या सीबीआय कार्यालयात आणले गेले. याचबरोबर किरशानू नामक एक मध्यस्थालाही अटक करण्यात आली. त्याच्याकडून २१ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.