मॉस्को : भारत आणि रशियादरम्यान व्यापार असंतुलन कमी करण्यासाठी उपाययोजना शोधण्याचे आदेश रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत असून सध्या व्यापाराचे तागडे रशियाच्या बाजूला झुकलेले आहे. त्यामुळे भारताकडून जास्तीत जास्त कृषी उत्पादने आणि औषध उत्पादने खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे, असे पुतिन यांनी सुचवले आहे.

वार्षिक द्विपक्षीय परिषदेसाठी अध्यक्ष पुतिन डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येत आहेत. हा दौरा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, असे मॉस्को येथे आयोजित करण्यात आलेल्या वल्दाय अधिवेशनात संबोधित करताना पुतिन म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले मित्र आणि विश्वासू भागीदार आहेत, असे त्यांनी सांगितले. तसेच, “ते संतुलित, सूज्ञ आणि देशभावनेने प्रेरित आहेत,” अशा शब्दांमध्ये पुतिन यांनी मोदी यांची प्रशंसा केली. मोदी यांच्याबरोबर आपले संभाषण विश्वासावर आधारित असते आणि त्यांच्याबरोबर आपल्याला मोकळेपणाने बोलता येते असे पुतिन म्हणाले.

भारत आणि रशियादरम्यानचा वार्षिक व्यापार सध्या ६३ अब्ज डॉलर इतका आहे. अमेरिकेच्या दबावाखाली येऊन भारत रशियाबरोबरचा व्यापार कमी करणार नाही, अन्य देशाने केलेल्या दादागिरीमुळे राष्ट्रहित आणि प्राधान्याविरोधात धोरण आखणे भारतीय जनतेला पसंत पडणार नाही, असा विश्वास पुतिन यांनी यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले, “भारताकडून अधिक कृषी उत्पादनांची खरेदी केली जाईल. तसेच औषधे आणि औषधी उत्पादनांच्या खरेदीसाठी आपल्या बाजूने काही उपाय केले जातील.” भारत आणि रशियादरम्यान प्रचंड आर्थिक सहकार्याला वाव आहे, पण या संधी साधण्यासाठी काही मुद्दे सोडवणे आवश्यक आहे, असे पुतिन यांनी सांगितले.

अमेरिकेच्या आयातशुल्काचा भारताला फायदाच!

अमेरिकेने भारतावर ५० टक्के आयातशुल्क लादले आहे. यापैकी २५ टक्के आयातशुल्क हे रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी करत असल्यामुळे लादलेले दंडात्मक आयातशुल्क आहे. यामुळे भारताचे जे काही नुकसान होईल, ते त्यांनी रशियाकडून तेल खरेदी केल्याने भरून निघेल, असे मत पुतिन यांनी व्यक्त केले. तसेच एक सार्वभौम राष्ट्र म्हणून भारताची प्रतिष्ठा कायम राहील असेही ते म्हणाले.

अमेरिकेने आपल्यावर मोठे आयातशुल्क लादणे हे भारतीय जनता कधीही सहन करणार नाही. मी पंतप्रधान मोदी यांना ओळखतो, तेही अमेरिकेच्या दबावाखाली रशियाबरोबर व्यापारासंबंधी निर्णय घेणार नाहीत. – व्लादिमिर पुतिन, अध्यक्ष, रशिया