नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी दररोज केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारून लक्ष्य करत आहेत. राहुल गांधी यांनी शुक्रवारीही तीन प्रश्न विचारून केंद्राची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावर भाजपने राहुल गांधींवर ‘निशान-ए-पाकिस्तान’ असल्याची टीका केली.

‘ऑपरेशन सिंदूर’शी तडजोड करून भारताने पाकिस्तानशी शस्त्रसंधी केला. शस्त्रसंधीसाठी अमेरिकेने मध्यस्थी केली होती. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान एकसमान स्तरावर येऊन बसले आहेत. त्यामुळे जगातील देशाचा स्तर खालावला आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच स्तरावर का आले? ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानच्या विरोधात एकही देश का बोलत नाही. पाकिस्तानची निंदा करण्यासाठी एकही देश भारताच्या पाठीशी का नाही? भारत व पाकिस्तान (पान १४ वर) (पान १ वरून) यांच्यामध्ये मध्यस्थी करण्यास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोणी सांगितले, असे तीन प्रश्न शुक्रवारी राहुल गांधींनी ‘एक्स’वरून विचारले.

राहुल गांधी सातत्याने प्रश्न विचारत असल्यामुळे संतप्त झालेल्या भाजपने राहुल गांधी भारताची बदनामी करत असल्याचा आरोप केला. भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत, राहुल गांधी हे ‘निशान-ए-पाकिस्तान’ असून त्यांच्या विधानांचा पाकिस्तान स्वत:च्या फायद्यासाठी वापर करून घेत आहे.

यापूर्वीही राहुल गांधींनी केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यावर टीका करत प्रश्नांची सरबत्ती केली होती. जयशंकर यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती पाकिस्तानला का दिली? जयशंकर यांच्या बेजबाबदार कृतीमुळे भारताची किती लढाऊ विमाने पडली? अमेरिकेची मध्यस्थी मान्य का केली, असे प्रश्न विचारले होते. या सर्व प्रश्नांवर केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले होते तरीही राहुल गांधींनी प्रश्न विचारणे थांबवलेले नाही. राहुल गांधींच्या या कृतीवर भाजपने ताशेरे ओढले आहेत. राहुल गांधींनी ते भारताच्या बाजूने आहेत. की पाकिस्तानच्या हे ठरवले पाहिजे, असे भाटिया म्हणाले.

हरिवंश यांची वक्तव्यावर नाराजी

राज्यसभेचे उपसभापती व जनता दलाचे नेते हरिवंश यांनीही राहुल गांधींवर टीका केली. राहुल गांधींनी पाकिस्तानच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला प्रश्न विचारणे थांबवावे नाही तर आम्हालाही भूतकाळात काय काय झाले हे सांगता येईल, असे हरिवंश म्हणाले. २००४ ते २०१४ या दहा वर्षांमध्ये अशा अडीच हजार घटना मी सांगू शकतो, जिथे कठोर कारवाई करण्याची गरज होती, पण केली गेली नाही. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भेटीला गेलेल्या तत्कालीन पंतप्रधानांनी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या जवानांच्या हत्येच्या घटना लपवल्या होत्या, असे सांगत हरिवंश यांनी तत्कालीन काँग्रेस सरकार अमेरिकेसमोर झुकल्याचा अप्रत्यक्ष आरोप केला.