Rahul Gandhi Birthday Gift to Kharge’s Granddaughter : काँग्रेसने समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये राहुल गांधी यांनी रस्त्यावरील श्वानाचं एक छोटंसं पिल्लू काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नातीला भेट म्हणून दिल्याचं पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांनी खर्गे यांच्या घरी जाऊन त्यांच्या नातीला वाढदिवसानिमित्त हे पिल्लू भेट म्हणून दिलं. एका सजवलेल्या पिंजऱ्यातून राहुल गांधी श्वानाचं पिल्लू घेऊन गेले आणि त्यानंतर ते पिल्लू त्यांनी खर्गे कुटुंबाकडे सोपवलं. खर्गे यांच्या नातीसह त्यांच्या घरातील इतर सदस्य देखील ही गोंडस भेट पाहून खूश झाले.
राहुल गांधी खर्गे यांच्या नातीला ही गोड भेट देतानाचा व्हिडीओ काँग्रेसने भारत जोडो या इन्स्टाग्राम हॅण्डलवरून शेअर केला आहे. यासह कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की “छोट्या बास्केटमध्ये मोठ्ठं प्रेम, राहुल गांधींकडून खर्गें यांच्या नातीच्या वाढदिवसानिमित्त अविस्मरणीय अशी भेट.”
नेटकऱ्यांकडून राहुल गांधींचं कौतुक
राहुल यांनी भेट म्हणून दिलेलं श्वानाचं पिल्लू खर्गे यांच्या नातवंडांबरोबर व कुटुंबातील इतर सदस्यांबरोबर खेळताना दिसत होतं. अनेक नेटकऱ्यांना राहुल यांची ही भेट आवडली आणि त्यांनी इन्स्टाग्रामवर त्यांचं कौतुक केलं. खूप विचार करून राहुल यांनी अविस्मरणीय अशी भेट दिल्याचं मत काहींनी व्यक्त केलं.
गिफ्ट बॉक्सवर काही नेटकऱ्यांचा आक्षेप
दुसऱ्या बाजूला, काही टीकाकार राहुल यांच्या या कृतीकडे नकारात्मकतेनं पाहात असल्याचं त्यांच्या कमेंट्सवरून दिसून आलं. काहींनी प्राण्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला. “राहुल यांनी श्वानाचं पिल्लू गिफ्ट बॉक्समध्ये ठेवायला नको होतं, त्याला श्वास घ्यायला त्रास झाला असेल”, अशा टिप्पण्या देखील काहींनी केल्या आहेत.
भटक्या श्वानासाठी हक्काचं घर
अलीकडेच भटक्या कुत्र्यांवरून देशभरातील वातावरण तापलं आहे. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याच्या तक्रारी येत आहेत. भटक्या कुत्र्यांचे लहान मुलांसह ज्येष्ठांवरील हल्ले वाढत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या कशी नियंत्रणात आणता येईल यावर देशभर चर्चा चालू आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आहे. अशातच राहुल गांधी यांनी भटक्या कुत्र्याच्या एका पिल्लाला हक्काचं घर मिळवून दिलं आहे. त्यामुळे राहुल यांच्या या कृतीचं कौतुक होत आहे.