लोकसभा निवडणूक आता शेवटच्या टप्पात आहे. येत्या १ जून रोजी देशात सातव्या म्हणजेच शेवटच्या टप्प्याचे मतदान पार पडणार आहे. त्यानुसार आज संध्याकाळी ६ वाजता प्रचाराची मुदतदेखील संपली आहे. दरम्यान, प्रचाराच्या तोफा थंडावताच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना उद्देशून व्हिडीओ शेअर केला आहे.
राहुल गांधी यांनी एक्स या समाज माध्यमावर हा व्हिडीओ शेअर केला असून त्यांनी देशातील जनतेचे, इंडिया आघाडीतील नेत्यांचे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. तसेच येत्या ४ जून रोजी इंडिया आघाडीचे सरकार बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा – देवेंद्र फडणवीसांचा टोला, “राहुल गांधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षही होऊ शकतात, मुंगेरीलाल के हसीन सपने..”
राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?
“आज निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मी देशातील जनतेचे तसेच देशाची राज्यघटना वाचवण्यासाठी खंबीरपणे उभे राहिलेल्या इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. याबरोबरच मी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विश्वासाने सांगतो की येत्या ४ जून रोजी देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे”, असं राहुल गांधी यांनी व्हिडीओत म्हटलं आहे.
पुढे बोलताना, “आम्ही जनतेशी निगडीत मुद्यांवर निवडणूक लढवण्यात यशस्वी झालो असून यादरम्यान पंतप्रधान मोदींना अनेकदा प्रचाराची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना त्यात यश आले नाही”, असेही ते म्हणाले. तसेच “आम्ही प्रचारादरम्यान देशातील शेतकरी, कामगार, तरुण, महिला आणि वंचितांशी संबंधित मुद्द्यांवर आवाज उठला. तसेच समाजातील प्रत्येक घटकाचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही देशातील जनतेला काही हमी दिल्या आहेत. या हमी निश्चितत क्रांतीकारी ठरणार आहेत”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
हेही वाचा – राहुल गांधी यांना पुणे न्यायालयासमोर हजर राहण्याचा आदेश, सावरकर यांच्याबद्दलचे वादग्रस्त वक्तव्य प्रकरण
यावेळी त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना मतदान केंद्र आणि मतमोजणी केंद्रांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आवाहनही केलं. “शेवटच्या टप्प्यातील मतदानाचा दिवस जवळ आला आहे. मी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो की शेवटच्या क्षणापर्यंत मतदान केंद्र तसेच मतमोजणी केंद्रांवर बारकाईने लक्ष ठेवावं”, असे ते म्हणाले.