केरळमध्ये इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. डाव्या पक्षांनी पाठिंबा दिलेले आमदार पीवी अनवर यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना त्यांचा डीएनए तपासण्याची मागणी केली आहे. केरळच्या मलप्पुरम येथे सोमवारी (दि. २२ एप्रिल) प्रचार सभेत बोलत असताना अनवर म्हणाले, “राहुल गांधी यांना गांधी आडनाव वापरण्याचा कोणताही अधिकार नाही. ते एखाद्या चतुर्थश्रेणीच्या नागरिकाच्या पातळीपर्यंत घसरले आहेत. मला तर प्रश्न पडतो की, ते नेहरूंच्या कुटुंबात जन्माला आले आहेत का? त्यामुळे त्यांचा डीएनए तपासला जावा.”

राहुल गांधी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यावर केलेल्या टिप्पणीनंतर अनवर यांनी राहुल गांधी यांना लक्ष्य केले. त्यानंतर विजयन यांनी अनवर यांच्या विधानाची बाजू उचलून धरली. ते म्हणाले, “राहुल गांधी यांनी बोलताना काळजी घेतली पाहीजे, त्यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले जाऊ शकते, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहीजे. राहुल गांधी यांना टीकेपासून संरक्षण मिळालेले नाही. काँग्रेस नेत्यांशी अनौपचारिक गप्पा मारताना ते म्हणाले की, राहुल गांधी आता बदलले आहेत. मला वाटतं, ज्या माणसाने भारतभर पदयात्रा केली आहे, त्याने थोडं ज्ञानही मिळवायला हवं. पण त्यांनी हल्लीच केरळमध्ये येऊन जे विधान केलं, ते त्यांना राजकीय नेता म्हणून शोभणारे नाही. त्यांनी भाजपाला मदत होईल, असे काही बोलू नये.”

फक्त स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने करायचा घरफोडी; बिहारच्या ‘रॉबिन हूड’ला केरळमध्ये केलेली चोरी पडली महागात

राहुल गांधी काय म्हणाले होते?

मागच्या आठवड्यात केरळमधील एका सभेला संबोधित करत असताना राहुल गांधी म्हणाले की, सध्या दोन मुख्यमंत्री तुरुंगात आहेत. केरळचेही मुख्यमंत्री तुरुंगात जाणार नाहीत कशावरून? मी भाजपावर दिवसरात्र टीका करत असतो आणि केरळचे मुख्यमंत्री अहोरात्र माझ्यावर टीका करत असतात. हे जरा गोंधळात टाकणारे आहे.

दुसरीकडे काँग्रेसनेही मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची चौकशी सुरू असल्या कारणाने ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत नाहीत. विजयन यांची मुलगी विणाच्या आयटी कंपनीत पेमेंट घोटाळा झाला आहे. तसेच त्रिशूरमधील सहकारी बँकेतही घोटाळा झाला, त्यामुळे विजयन भाजपावर टीका करत नाहीत, असा काँग्रेसचा आरोप आहे.

काँग्रेसच्या टीकेनंतर मुख्यमंत्री विजयन यांनी आणीबाणीची आठवण करून दिली. राहुल गांधी यांच्या आजीने मला आणि माझ्या सहकाऱ्यांना दीड वर्ष तुरुंगात टाकले होते, असा पलटवार त्यांनी केला.