Raja Raghuvanshi Murder Case : मध्य प्रदेशच्या इंदोरमधील एक दाम्पत्य बेपत्ता झाल्याच्या घटनेनंतर सोनम आणि तिचा पती राजा रघुवंशी हे २२ मे रोजी शिलाँगमधून अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडल्याची माहिती समोर आली होती या घटनेनंतर २ जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. राजा रघुवंशीचा मृतदेह आढळून आल्यानंतर सोनम रघुवंशी ही बेपत्ता झाली होती. त्यामुळे या प्रकरणात अनेक शंका उपस्थित करण्यात येत होत्या. असं असतानाच आज (९ जून) सकाळी गाझिपूरमध्ये सोनम एका ढाब्यावर आढळून आली, त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं.

राजा रघुवंशीची हत्या प्रकरणात सोनमचा सहभाग असल्याचा दावा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. या संपूर्ण घटनेबाबत आता राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशीच्या कुटुंबियांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी राजा रघुवंशी आणि सोनमच्या आई वडिलांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणात आता एका २१ वर्षीय राज कुशवाहा नामक व्यक्तीला पोलिसांनी अटक केलं असून तो या घटनेतील मुख्य आरोपी असल्याचा संशय पोलिसांना आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

सोनमचा या गुन्ह्याच्या नियोजनात सहभाग असल्याचा संशय मेघालय पोलिसांना आहे. पोलीस तिच्या चौकशीसाठी आणि मेघालयात आणण्याच्या प्रक्रियेत आहेत. या प्रकरणाबाबत मेघालय पोलिसांनी सोमवारी दुपारी सांगितलं की, २४ वर्षीय सोनम रघुवंशी ही तिचा नवविवाहित पती राजा रघुवंशीच्या हत्येतील प्रमुख संशयितांपैकी एक आहे. तसेच २१ वर्षीय राज कुशवाहा याला काल रात्री इंदूर येथून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण चार जणांना अटक करण्यात आली असून मेघालय पोलिसांचं एक पथक सोनमला अटक करण्यासाठी उत्तर प्रदेशातील गाजीपूरला रवाना झालेलं आहे.”

मेघालयातील पूर्व खासी हिल्सचे पोलीस अधीक्षक विवेक सायम यांनी सांगितलं की, “सोनमबरोबर २१ वर्षीय राज कुशवाहा याचे संबंध असल्याचा संशय आहे. राज कुशवाहा हा इतर तीन आरोपींचा हँडलर होता. जे तीन आरोपी हल्लेखोर असल्याचा संशय आहे. मात्र, पोलिसांनी सांगितलं की, राज कुशवाहा हा स्वतः मेघालयात गेला नव्हता. पण गुन्ह्याच्या नियोजनात तो आणि सोनमचा सहभाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे चौकशीसाठी तिला मेघालयात आणण्यासाठी पोलीस कायदेशीर प्रक्रियेत आहेत.”

दरम्यान, काल रात्री अटक करण्यात आलेल्या इतर दोघांमध्ये विशाल चौहान (२२) आणि आकाश राजपूत (१९) यांचा समावेश आहे. त्यांना इंदूर येथून अटक करण्यात आली आहे. चौथा व्यक्ती आनंद सिंग कुर्मी (२३) याला सोमवारी दुपारी मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक विवेक सायम यांनी पुढे म्हटलं की, “मेघालय पोलिसांच्या दोन पथकांनी रविवारी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात प्रवास केला. स्थानिक पोलिसांसह या ठिकाणी छापे टाकून अटक करण्यात आली. तसेच तिसरे पथक उत्तर प्रदेशातील गाजीपूर जिल्ह्यात जात असून तिथे सोनम स्थानिक पोलिसांच्या ताब्यात आहे.”

राज कुशवाहाशी सोनमचे प्रेमसंबंध असल्याचा संशय

मेघालय पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार राजाच्या हत्या प्रकरणात सोनमच सामील आहे. सोनमचं अफेअर सुरु होतं त्यामुळेच लग्नानंतर तिने पती राजाची हत्या घडवून आणली. राज कुशवाह या तरुणाशी तिचे प्रेमसंबंध होते असा दावा मेघालय पोलिसांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणात सोनम जेव्हा सत्य सांगेल तेव्हाच काय ते समोर येईल असं राजा रघुवंशीचा भाऊ विपिनने म्हटलं आहे.

कोण आहे सोनम रघुवंशी?

सोनम रघुवंशी ही मध्य प्रदेशातील इंदूरची रहिवासी आहे. तिचा नवरा राजा रघुवंशीही याच शहरात राहात होता. राजा आणि तिचं लग्न झाल्यानंतर हे दोघंही २० मे रोजी मधुचंद्रासाठी गेले होते. सुरुवातीला ते दोघंही बंगळुरुला गेले, त्यानंतर गुवाहाटीला गेले. तिथे या दोघांनीही कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. यानंतर दोघंही शिलाँगला रवाना झाले. शिलाँगला २३ मे रोजी गेल्यापासून या दोघांचाही संपर्क होत नव्हता. मेघालयातील पर्वतरांगांमधून हे दोघंही बेपत्ता झाले होते. सोनम ही नंदगंज या ठिकाणी सापडली. वाराणसीपासून ४० किमी अंतरावर हे ठिकाण आहे. गाझिपूर पोलिसांना तिच्याबाबत माहिती मिळाली. त्यांनी मध्य प्रदेश पोलिसांना ही माहिती दिली. ज्यानंतर सोनम रघुवंशीला काशी येथील ढाब्यावरुन ताब्यात घेण्यात आलं असून तिच्या अटकेची प्रक्रिया सुरु आहे.