बलात्कारासारख्या अमानवी अत्याचाराला आळा घालण्यासाठी देशात आजपर्यंत अनेक कायदे करण्यात आले. विविध राज्यांमध्ये देखील यासंदर्भात भिन्न प्रकारचे कायदे आहेत. मात्र, तरीदेखील देशात अद्याप बलात्कारासारख्या घटनांना आवर घालण्यात अपयशच येत असल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर फक्त कायदे करून भागणार नाही, तर लोकांची मानसिकताच बदलणं आवश्यक आहे, असा विचार सातत्याने मांडला जातो. ही मानसिकता बदलणं किती आवश्यक आहे, याचाच प्रत्यय राजस्थानमधील एका मंत्र्याने नुकत्याच केलेल्या एका धक्कादायक विधानामुळे आला आहे. गंभीर बाब म्हणजे त्यांनी हे विधान राजस्थानच्या विधानसभेत केलं आहे. त्यामुळे यावरून खळबळ उडाली असून संबंधित मंत्र्यांवर चहूबाजूंनी टीका केली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजस्थानच्या विधिमंडळात सध्या अधिवेशन सुरू असून त्यादरम्यान राज्यातल्या बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान काँग्रेस पक्षाचे आमदार आणि राज्याचे वीज पुरवठा मंत्री एस. के. धारीवाल यांनी यासंदर्भात वादग्रस्त विधान केलं आहे. या विधानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी लागलीच सारवासारव करण्याचा प्रयत्न करत माफी मागितली.

बलात्काराच्या बाबतीत राजस्थान पहिल्या क्रमांकावर..

यावेळी बोलताना धारीवाल यांनी राजस्थान बलात्कारांच्या बाबतीत देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचं सांगितलं. “बलात्कार आणि हत्येच्या बाबतीत राजस्थान ११व्या स्थानी आहे. पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश, दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश, तिसऱ्या क्रमांकावर आसाम, चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्र, पाचव्या क्रमांकावर ओडिशा, सहाव्या क्रमांकावर तेलंगणा, सातव्या क्रमांकावर तेलंगणा आणि आठव्या क्रमांकावर पश्चिम बंगाल आहे. पण बलात्काराच्या बाबतीत आपण पहिल्या क्रमांकावर आहोत. यात कोणताही संभ्रम नाही”, असं धारीवाल यावेळी म्हणाले.

दरम्यान, राजस्थान पहिल्या क्रमांकावर का आहे? याविषयी बोलताना धारीवाल यांची जीभ घसरली. “आता हे असं का आहे? कुठे ना कुठे चूक तर आहेच. तसाही राजस्थान पुरुषांचाच प्रदेश राहिला आहे. आता त्याचं काय करणार?”, असं धारीवाल म्हणाले.

व्हिडिओ व्हायरल होताच सारवासारव

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्यानंतर धारीवाल यांनी सारवासारव केली आहे. “मी नेहमीच महिलांचा आदर केला आहे. त्यांना सर्वच क्षेत्रात सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित केलं आहे. माझ्याकडून चुकून ते विधान बोललं गेलं. मला खरं तर ‘या प्रदेशात हा प्रकार कुठून आला’ असं म्हणायचं होतं. पण त्याऐवजी मी ‘हा पुरुषांचा प्रदेश आहे’ असं म्हणालो. यासाठी मी सभागृहात माफी मागेन”, असं धारीवाल म्हणाले आहेत.

धारीवाल यांच्या विधानावर चहूबाजूंनी टीका केली जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajasthan minister s k dhariwal controversial statement on rape cases viral video pmw