Rajkot Rape Case Vijay Radadiya Arrested : राजकोट येथील एका शैक्षणिक संस्थेचा विश्वस्त व भाजपा कार्यकर्ता विजय रादडिया याला २१ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तो गेल्या ४० दिवसांपासून फरार होता. मात्र गुरुवरी (६ सप्टेंबर) रात्री त्याने आत्मसमर्पण केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पीडित तरुणी ही रादडिया ज्या शैक्षणिक संस्थेचा विश्वस्त म्हणून काम पाहत होता त्याच संस्थेत शिक्षण घेत आहे, तसेच संस्थेच्या वसतीगृहात काम करते. जुलै महिन्यात रादडिया व त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून तो फरार होता.

बलात्कार प्रकरणात अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी त्याने न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळल्यानंतर दोन दिवसांनी त्याला अटक झाली. विजय रादडियाची पत्नी दक्षा रादडिया राजकोट जिल्हा परिषद सदस्य आहे. २५ जुलै रोजी विजय रादडिया व तो वास्तव्यास असलेल्या गावचा सरपंच मधू थडानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित तरुणीने आरोप केला होता की या दोघांनी जून महिन्यात संस्थेच्या परिसरात तिच्यावर बलात्कार केला होता. तरुणीने सांगितलं होतं की थडानी, रादडिया व थडाने हे दोघे संस्थेच्या तत्कालीन व्यवस्थापकीय विश्वस्तांबरोबर नेहमी संस्थेच्या परिसरात यायचे. त्याचदरम्यान, त्यांनी पीडितेला पाहिलं व ते तिच्यावर लक्ष ठेवून होते.

पीडितेने तिच्या तक्रारीत म्हटलं आहे की, थडानी व रादडिया यांनी जून महिन्याच्या सुरुवातीला तिला त्रास देण्यास, तिचा छळ करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला इशारे केले जात होते. त्यानंतर एक दिवस थडानी याने तिला बोलावून घेतलं. थडानीने तिला त्याच्या खोलीत थांबायला सांगितलं. त्यानंतर थडानी व रादडिया या दोघांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतरही थडानी तिला त्रास देत होता. तिचा छळ करत होता.

हे ही वाचा >> Kolkata RG Kar Doctor Case : “संजय रॉयला जामीन द्यायचा का?”, सुनावणीवेळी वकील उपस्थित नसल्याने न्यायालयाने सीबीआयला फटकारलं

थडानीला न्यायालयीन कोठडी

थडानी याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. न्यायमूर्तींनी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. थडानी याने अटकेच्या आधी समाजमाध्यमांवर एक पोस्ट केली होती. त्यात त्याने म्हटलं होतं की त्याला या प्रकरणात अडकवलं जात आहे. हे राजकीय षडयंत्र आहे. त्याने त्याच्या पोस्टमध्ये रादडियाबरोबरच्या मैत्रीची कबुली दिली होती.

हे ही वाचा >> Manipur Drone Attack : मणिपूर हादरलं! माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर रॉकेट हल्ला; एकाचा मृत्यू, पाच जण जखमी

न्यायालयाचा रादडियाला दणका

रादडियाच्या अटकपूर्व जामीन अर्जाला उत्तर देताना राजकोट ग्रामीण पोलिसांनी असा युक्तिवाद केला होता की त्याची पत्नी जिल्हा परिषद सदस्य आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी सरपंच आहे. ही मंडळी राजकीय शक्ती वापरून साक्षीदार व पुराव्यांशी छेडछाड करू शकतात. न्यायालयाने देखील पीडित तरुणी व पोलिसांचा युक्तिवाद एकून रादडियाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.