रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे त्यांच्या खास शैलीतील कवितांसाठी प्रसिद्ध आहेत. अनेकदा त्यांच्या कविता या उपस्थितांना खळखळून हसायला भाग पाडतात. असाच काहीसा अनुभव राज्यभेतील सदस्यांनाही आला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी पहिल्यांदा राज्यसभेचे उपसभापती म्हणून कामकाज पाहीलं, तेव्हा मंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्यासाठी कविता सादर केली. त्यांची कविता आणि भाषण ऐकताना उपस्थित राज्यभा सदस्य मात्र पोटदुखेपर्यंत हसत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रामदास आठवले सभागृहात बोलताना म्हणाले, “जर तुम्ही मला जास्त बोलू दिलं तरच मी कविता ऐकवेन नाहीतर एकही कविता ऐकवणार नाही. माझ्या पक्षाचे लोक मला विचारतात की तुमच्या पार्टीचा लोकसभेत एकही सदस्य नाही, तरी तुम्ही मंत्री कसे काय? मी त्यांना सांगतो हे तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच जाऊन विचारा.” यानंतर आठवलेंनी कविता सादर करण्यास सुरुवात केली.

“मी अन्यायाविरोधात लढलो आहे, म्हणून तर तुमचे अभिनंदन करण्यासाठी इथे उभा आहे. तुमचा अनुभव फार मोठा आहे, म्हणून तुम्ही संघर्षाचा पहाड चढला आहे.
माझ्या पार्टीचा मी आहे एकला आणि माझ्या हाती आहे संविधानाचा पेला, मी तर आहे तुमचा सच्चा चेला, म्हणून मला नका सोडू एकला.
ज्यांनी उपराष्ट्रपती पदाचा सर केला आहे गड त्यांचं नाव धनकड. आपल्याला मिळून उखडायची आहे विषमतेची जड, यामध्ये नक्कीच यशस्वी होतील धनकड.
सभागृहात जे सदस्य करतील ‘फ्रॅक्शन’ त्यांच्यावर व्हायला हवी कडक ‘अॅक्शन’, आपल्याला तर मजुबत करायचा आहे भारत ‘नेशन’, गोंधळ घालण्याची आपल्याला नकोय ‘फॅशन’…”

कविता सादर केल्यानंतर रामदास आठवले धनकड यांना उद्देशून पुढे म्हणाले, “आम्हाला संपूर्ण विश्वास आहे की तुम्ही संघर्ष करत, करत इथंपर्यंत पोहचला आहात. गावातील शेतकऱ्याच्या मुलापासून आपण एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहचला आहात. यामध्ये तुमचा अनुभव आणि फार मोठा संघर्ष आहे. खूप मोठं कार्य तुम्ही केलं आहे. तुम्ही पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल पदावर जे कार्य केलं आहे, तिथे फार मोठं आव्हान होतं. तिथे काम करणे फार अवघड होते, मात्र तुम्ही बंगालमध्ये फारच चांगलं काम केलं आहे. बंगालमध्ये तुम्ही चांगलं काम केलं त्यामुळे तुम्हाला इथे आणण्याचे प्रयत्न झाले आहेत. तुम्ही एक संघर्षशील नेते आहात, जर तिथे तुमचे काम ठीक नसते, तर कदाचित हे पद तुम्हाला मिळणं फार अवघड होतं. पण तुम्ही चांगलं काम केलं आहे.”

याचबरोबर, “मी शिर्डीत हारलो, पण मी घरात बसलो नाही. मी फिरत राहिलो, फिरत राहिलो. मी काँग्रेससोबत होतो, काँग्रेसचे माझे सर्व मित्र आहेत. समाजवादी पार्टीचे माझे मित्र आहेत, कम्युनिस्ट पार्टीचे माझे मित्र आहेत आणि आता भाजपाचे माझे मित्र आहेत. आता भाजपासोबत मी आलो आहे आणि यासाठी आलो आहे कारण मला शिर्डीत हरवलं गेलं, मला मंत्री नाही बनवलं. मग मी तिकडे काय करू?. त्यामुळे मला काँग्रेसला सोडावं लागलं.” असंही आठवले यांनी यावेळी सांगितले.

याशिवाय, “मी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सबका साथ सबका विकास, दिसतोय सगळा प्रकाश. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात मी निर्णय घेतला. मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे आणि सत्तेत यायलं हवं असं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे. माझा एकटा पक्ष सत्तेत येऊ शकत नाही, कुणासोबत मिळूनच सत्तेत येऊ शकतो.” असंही ते म्हणाले.

“मला विचारलं जातं की तुमच्या पार्टीचा एकही सदस्य लोकसभेत नाही, तरीही तुम्ही मंत्री कसे काय? तर मी म्हणालो की तुम्ही नरेंद्र मोदींना जाऊन विचारा. मी कसा काय मंत्री आहे. मी एकटाच आहे परंतु माझ्या पक्षाचे लोक संपूर्ण देशभर आहेत. मला बोलण्याची संधी द्या, मला माहीत आहे की तुम्ही फार चांगले व्यक्ती आहात. तुम्ही मला नेहमी म्हणायचा की आम्हाला कविता ऐकवा. जर तुम्ही मला जास्त बोलू दिलं तरच मी कविता ऐकवेन नाहीतर एकही कविता ऐकवणार नाही.” असं शेवटी आठवले म्हणताना दिसले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas athawale presented a poem for jagdeep dhankad in rajyabhata msr
First published on: 07-12-2022 at 19:07 IST