Ranchi Restaurant Owner Shot Over Chicken Biryani: रांचीमधील एका ४७ वर्षीय हॉटेल मालकाची, शाकाहारी ग्राहकाला मांसाहारी बिर्याणी दिल्याचा आरोप करत, गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली. शनिवारी रात्री ११.३० च्या सुमारास कांके-पिथोरिया रोडवरील हॉटेलमधून एका ग्राहकाने शाकाहारी बिर्याणी मागवली आणि पार्सल घेतल्यानंतर निघून गेला. परंतु काही वेळाने तो परत आला आणि त्याने तक्रार केली की त्याला मांसाहारी बिर्याणी देण्यात आली आहे, असे पोलीस अधीक्षक (ग्रामीण) प्रवीण पुष्कर यांनी सांगितले.

विजय कुमार नाग (४७) असे रेस्टॉरंट मालकाचे नाव आहे. ते टेबलावर जेवत असताना, तक्रार करणाऱ्या ग्राहकासोबत आलेल्या एकाने त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्या छातीत गोळी लागली आणि रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. हॉटेल मालक कांके पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भिठ्ठा येथील रहिवासी होता.

हॉटेल मालकाचा मृतदेह राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (रिम्स) येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस अनेक ठिकाणी छापे टाकत आहेत. “आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करत संतप्त स्थानिकांनी रविवारी सकाळी कांके-पिथोरिया रोड काही काळासाठी रोखला. हल्लेखोरांना लवकरच अटक केली जाईल,” असे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी रस्ता मोकळा केला, असे कांके पोलीस ठाण्याचे प्रमुख प्रकाश रजक यांनी सांगितले. या घटनेमागे आणखी काही हेतू आहे का, याचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, कांकेचे काँग्रेस आमदार सुरेश कुमार बैठा म्हणाले की, हे प्रकरण केवळ बिर्याणी वादापुरते मर्यादित नाही. त्यांनी आरोप केला की, काही लोकांचा हॉटेल मालकाच्या मालमत्तेवर डोळा आहे.

पोलिसांनी सर्व आरोपींना २४ तासांच्या आत अटक करावी, अशी मागणी करत मृत हॉटेल मालकाच्या कुटुंबीयांनी रविवारी निदर्शने केली. आरोपींचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.