नवी मुंबई: दुबईत मोठ्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत एक महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. सिराज इद्रीस चौधरी या ५५ वर्षीय आरोपीला या प्रकरणी वाशी पोलिसांनी अटक केली आहे. १७ जून रोजी वाशी पोलिसांकडे पीडित महिलेने तक्रार नोंदवली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी कारवाई करून आरोपीला मुंबईतून अटक केली. आरोपी हा विक्रोळीतील टागोरनगर येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. तसंच आरोपीवर मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचेही तपासात समोर आले आहे.

मुंबईसारख्या शहरातही नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी असे आरोपी जाळं टाकून त्यांचा गैरफायदा घेतात. दुबईमध्ये मोठ्या पगाराची नोकरी मिळवून देऊ असे आमिष दाखवून सिराज चौधरी या इसमाने पीडित महिलेला स्वत:च्या जाळ्यात अडकवले. काही दिवसांनी नोकरी मिळेल असं आमिष दाखवत त्याने या पीडित महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

सिराज चौधरी याने याआधीही अनेक गुन्हे केले आहेत. जूनमध्ये दाखल झालेल्या तक्रारीनंतर या आरोपीला ताब्यात घेत १५ जुलै रोजी वाशी पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले. वाशी न्यायालयात आरोपीला हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तसंच या प्रकरणाच्या पुढील सुनावणीत १६ जुलै रोजी त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.