नवी दिल्ली : प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदानाची माहिती (विदा) मतदान संपल्यानंतर ४८ तासांच्या आत केंद्रीय निवडणूक आयोगाने संकेतस्थळावर जाहीर करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठाने शुक्रवारी स्थगिती दिली. लोकसभेची निवडणूक सुरू असल्याने मतदानासंदर्भातील कोणत्याही प्रक्रियेमध्ये न्यायालय जाणीवपूर्वक हस्तक्षेप करणार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झाले असले तरी उर्वरित दोन टप्प्यांतील मतदानाचा आकडा तातडीने प्रसिद्ध करण्याच्या मागणीवर शुक्रवारी न्यायमूर्ती दिपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्यासमोर सुनावणी झाली. निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्याचा आदेश दिला, तर आयोगावर कामाचा अधिक ताण पडू शकतो. मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झाले असून ४ जून रोजी मतमोजणीही होणार आहे, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.

हेही वाचा >>>आयआयटीमधून पास होऊनही ३८ टक्के विद्यार्थी बेरोजगार; आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा, ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ यांच्या वतीने यासंदर्भात याचिका करण्यात आली आहे. मोईत्रा यांनी केलेल्या मूळ याचिकेबरोबर लोकसभा निवडणुकीनंतर या याचिकेवर सुनावणी घेतली जाऊ शकते.

न्यायालय काय म्हणाले?

●निवडणूक सुरू असताना या प्रकरणात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही. निवडणुकीनंतर या अर्जावर सुनावणी केली जाईल.

●आम्ही निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणू शकत नाही. आम्ही देखील जबाबदार नागरिक आहोत.

●शनिवारी सहाव्या टप्प्यातील मतदान होणार असून यासंदर्भात लोकसभा निवडणुकीनंतरच विचार केला पाहिजे.