Revanth Reddy On Hindi : दाक्षिणात्य राज्यांमध्ये हिंदी भाषेवरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. यादरम्यान तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी हिंदी लादली जाण्याचा जोरकसपणे विरोध केला आहे. तसेच त्यांनी लोकांवर सक्ती करण्यापेक्षा ही भाषा एक पर्याय राहिली पाहिजे असे मतही व्यक्त केले आहे. इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०२५ या कार्यक्रमात बोलताना रेड्डी यांनी भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार हिंदीच्या प्रसारासाठी करत असलेल्या प्रयत्नांवरही टीका केली. तसेच त्यांनी यावेळी भाषिक विविधतेचा आदर केला पाहिजे आणि ती जपली पाहिजे, असे मत व्यक्त केले.
रेड्डी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलुगू सारख्या भाषांसाठी काय केले असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित केला. रेड्डी म्हणाले की, “पर्याय असला पाहिजे. हिंदी ही काही राष्ट्रीय भाषा नाही. मोदी हिंदीसाठी इतके प्रयत्न करत आहेत, तेलुगू ही दुसर्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. तुम्ही काय केले? आमच्यावर हिंदी लादू नका.”
रेड्डी हिंदी का शिकले?
आपण हिंदी बोलणे का शिकलो हे सांगताना रेवंत रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तिखट शब्दांमध्ये टीका केली. आपण मोदींना राजकारणात टक्कर देण्यासाठी हिंदी शिकल्याचे सांगताना रेड्डी म्हणले की, “हिंदीमध्ये बोलतोय ना? मोदींना भिडण्यासाठी हिंदी शिकलो ना?.”
लोकांवर हिंदी शिकण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्याची आवश्यकता नसल्याचेही रेड्डी यावेळी म्हणाले. जर कोणाला आवड असेल तर तो आपोआप हिंदी शिकेल असेही त्यांनी नमूद केले. कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना जर्मन, फ्रेंच किंवा संस्कृत शिकण्याचे पर्याय दिलेले जातात हे देखील त्यांनी निदर्शनास आणून दिले.
केंद्र सरकारकडून स्थानिक भाषांकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या मुद्द्यावर देखील रेवंत रेड्डी यांनी भाष्य केले. “सर्वाधिक बोलली जाणारी भाषा ही हिंदी आहे, त्यानंतर तेलुगू आणि नंतर बंगाली. जर मोदी आणि भाजपा इतक्या आक्रमकपणे हिंदीचा आग्रह धरत असतील, तर तुम्ही तेलुगूसाठी या सुविधा पुरवल्या आहेत? त्यांनी नागरी परीक्षांमधून तेलुगू भाषा काढून टाकली आहे,” असेही रेड्डी म्हणाले.
रेड्डी यांनी स्पष्ट केले की ते हिंदीच्या विरोधात नाहीत पण ती लादली जाण्याला त्यांचा विरोध आहे. तुम्ही आमच्यावर हिंदी का लादत आहात? जर तो एक पर्याय असेल, तर कोणालाच अडचण नाही. मी आज हिंदीमध्ये बोलत आहे, मी भाषा शिकलो आणि आज ती बोलत आहे. ती आमच्यावर लादू नका, त्याच्या आम्ही विरोधात आहोत,” असे रेड्डी म्हणाले.
© IE Online Media Services (P) Ltd