Tejashwi Yadav on Nitish Kumar: राष्ट्रीय जनता दलाचे नेते (RJD) आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (यू) चे प्रमुख नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नितीश कुमार हे होत जोडत आमच्याकडे दोन वेळा आले होते. मी पुन्हा चूक करणार नाही, अशी गयावया ते करत होते. बिहारच्या राजकारणात नितीश कुमार यांची आता विश्वासाहर्ता आणि त्यांचा प्रभाव उरला नाही, असे तेजस्वी यादव म्हणाले. तसेच नितीश कुमार हे राज्याचा कारभार चालविण्यासाठी सक्षम नाहीत, असेही तेजस्वी यादव म्हणाले.

इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत असताना तेजस्वी यादव म्हणाले की, नितीश कुमार यांनी एकेकाळी राजकारणात जे कमावले, ते सर्व काही त्यांनी अलीकडच्या काळात गमावले आहे. आमचा पाठिंबा मागण्यासाठी नितीश कुमार दोन वेळा हात जोडत आमच्याकडे आले होते. पण आता भविष्यात ही चूक आम्ही पुन्हा करणार नाहीत. नितीश कुमार यांचा काळ आता संपला आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार असमर्थ ठरत आहेत.

हे वाचा >> Sushilkumar Shinde : “मी तेव्हा जम्मू-काश्मीरला जायला घाबरलो होतो”, सुशीलकुमार शिंदेंचं विधान चर्चेत

भविष्यकाळात पुन्हा कधी नितीश कुमार यांच्याशी हातमिळवणी करण्याची वेळ आल्यास करणार का? असा प्रश्न विचारला असता तेजस्वी यादव म्हणाले की, आता यापुढे आमचा पक्ष गतकाळात केलेल्या चुका पुन्हा करणार नाही. तसेच नितीश कुमार यांच्या सततच्या आघाडी बदलण्याच्या स्वभावाबाबत बोलताना तेजस्वी यादव म्हणाले की, जेव्हा ते आमच्याबरोबर असतात, तेव्हा ते भाजपाच्या विरोधात बोलतात आणि जेव्हा ते भाजपाबरोबर असतात, तेव्हा त्याच गोष्टी ते आमच्याबाबत बोलतात. त्यामुळे त्यांची विश्वासाहर्ता आता संपुष्टात आली आहे.

हे ही वाचा >> नितीश कुमारांना ‘एनडीए’शी प्रामाणिक असण्याबाबत का वारंवार द्यावं लागतंय स्पष्टीकरण? ‘त्या’मागचं राजकारण काय?

अलीकडे झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाने २३ जागा लढविल्या होत्या. मात्र त्यांना केवळ चार जागांवर विजय मिळविता आला. तरीही आगामी विधानसभा निवडणुकीत महागठबंधन चांगले यश मिळवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २०२५ मध्ये बिहारची जनता त्यांचे सरकार निवडेल आणि त्यांना असे करण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास तेजस्वी यादव यांनी व्यक्त केला.