Lalu Prasad Yadav Family Dispute Reactions: बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचा पराभव झाल्यानंतर लालू प्रसाद यादव यांच्या कन्या आणि तेजस्वी यादव यांच्या भगिनी रोहिणी आचार्य यांनी राजकारण सोडण्याचा आणि कुटुंबाशी असलेले संबंध तोडत असल्याचे जाहीर केल्यानंतर भाजपा आणि संयुक्त जनता दलाच्या नेत्यांनी रविवारी लालू प्रसाद यादव कुटुंबातील मतभेदांवर टीका केली.

तुमच्या कुटुंबाला तुटण्यापासून वाचवा

बिहार भाजपाचे अध्यक्ष दिलीप जयस्वाल म्हणाले की, त्यांनी रोहिणी आचार्य यांनी केलेल्या आरोपांबाबतच्या बातम्या पाहिल्या आहेत. ते म्हणाले, “रोहिणी आचार्य यांनी म्हटल्याप्रमाणे, त्यांना मारहाण करण्यात आली. लालूजींचे जीवन वाचवण्यासाठी किडनी दान करणाऱ्या मुलीला आता बाहेर फेकले जात आहे, हे वेदनादायक आहे. मी जास्त भाष्य करणार नाही, परंतु मी लालूजी आणि राबडीजींना हे सांगेन की, तुमच्या कुटुंबाला तुटण्यापासून वाचवा. एक बाहेरचा व्यक्ती तुमचे घर फोडत आहे. कुटुंबाचे रक्षण करा.”

राजकारणात कोणी यायला सांगितले होते?

दुसरीकडे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाचे विधान परिषद सदस्य खालिद अन्वर यांनी रोहिणी आचार्य यांच्या राजकारणात प्रवेश करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “रोहिणी आचार्य सिंगापूरहून बिहारमध्ये राजकारण करण्यासाठी का आल्या? त्यांना राजकारणात कोणी यायला सांगितले होते? आणि जर त्या फक्त लालू यादव यांची मुलगी आहेत म्हणून राजकारणात आल्या असतील, तर आता रडल्याने आणि कौटुंबिक वाद जनतेसमोर आणल्याने त्यांना सहानुभूती मिळणार नाही,” असे ते म्हणाले.

रोहिणी आचार्य यांची पोस्ट

लालू प्रसाद यादव यांच्या कन्या आणि तेजस्वी यादव यांच्या भगिनी रोहिणी आचार्य यांनी शनिवारी राजकारण सोडत असल्याचे जाहीर केले होते. याचबरोबर त्यांनी कुटुंबीयांशी सर्व संबंध तोडल्याचीही घोषणा केली होती.

रोहिणी आचार्य यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले होते की, “मी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर मी माझ्या कुटुंबीयांशीही सर्व संबंध तोडत आहे. संजय यादव आणि रमीज यांच्या सांगण्यावरून मी हा निर्णय घेतला आहे. मी जो काही निर्णय घेतला आहे, त्यासाठी पूर्णपणे मी जबाबदार आहे.”